शेजारी देशांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण मैत्री करारांवर स्वाक्षऱ्या करण्यास तयार आहोत, असे सांगून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सिल्क रोड पायाभूत प्रकल्पांसाठी ४० अब्ज डॉलरच्या विशेष निधीची घोषणा केली.
चीनने आतापर्यंत आठ देशांबरोबर मैत्री करार केले असून चीन इतरही शेजारी देशांशी मैत्रीचे करार करण्यास तयार आहे. त्याचबरोबर द्विपक्षीय संबंध सुधारण्याचीही आमची तयारी आहे. त्यामुळे या भागात स्थिरता नांदेल, असे त्यांनी चीन पुरस्कृत बोआव फोरम फॉर आशिया वार्षिक बैठकीत सांगितले. दक्षिण चीनमध्ये असलेल्या हैनान येथे ही परिषद घेण्यात आली.
जवळचे मित्र हे दूरच्या नातेवाइकांपेक्षा चांगले असतात, या अर्थाच्या चिनी म्हणीचा आधार घेत त्यांनी सांगितले, की आशियातील महासागर हे शांतीचे महासागर बनले पाहिजेत. संयुक्त, र्सवकष, शाश्वत व सहकार्यावर आधारित अशी सुरक्षा आशियातील देशांसाठी असली पाहिजे. नेपाळचे अध्यक्ष राम बरण यादव, श्रीलंकेचे अध्यक्ष मैथिरीपाल सिरिसेना या वेळी उपस्थित होते. भारत सरकारचा अधिकृत प्रतिनिधी तेथे नव्हता पण भारतीय उद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष शेखर दत्ता यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उपस्थित होते.
शेजारी देशांशी मैत्रीचे संबंध राखण्याच्या राजनीतीवर भर देताना शी जिनपिंग यांनी सिल्क रोड अँड मेरिटाइम सिल्क रोड प्रकल्प जाहीर केला. त्यासाठी चीनने ४० अब्ज डॉलरच्या निधीची घोषणा केली असून या प्रकल्पाचे काम सुरू झाली आहे.
सिल्क रोड प्रकल्प
सिल्क रोड हा ऐतिहासिक महत्त्वाचा प्रकल्प असून त्यामुळे चीन हा मध्य आशियामार्गे युरोपशी जोडला जातो. या प्रस्तावित प्रकल्पात बांगला देश-भारत-चीन-म्यानमार मार्गिकेचा समावेश आहे. तसेच पाकिस्तान व चीन आर्थिक मार्गिकाही पाकव्याप्त काश्मीरमधून जाते.

मेरीटाइम सिल्क रोड
हा सागरी मार्ग असून या प्रकल्पात चीनची बंदरे ही व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, भारत, श्रीलंका, ग्रीस व केनिया या देशांतील बंदरांना जोडण्याचा प्रस्ताव आहे. मेरीटाइम सिल्क रोड प्रकल्पामुळे चीनची बंदरे व यजमान देशाची बंदरे जोडली जाणार असल्याने व्यापार उदिमात फायदा होणार असला, तरी त्यामुळे यजमान देशांना चीनचे सामरिक व इतर हितसंबंध जपावे लागतील, असे सूचित करण्यात आले आहे.