अणू पुरवठादार गटांमध्ये भारताचा समावेश आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरवर बंदी घालण्याबद्दलच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नसल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. अणू पुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) सहभागी होण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय मसूद अजहरला संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित करावे, यासाठीदेखील भारताचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र या दोन्ही प्रयत्नांमध्ये चीनकडून खोडा घातला जातो आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिंगपिंग भारत दौऱ्यावर आले असताना चीनकडून त्यांच्या भूमिकेचा पुनराच्चार केला आहे.

गोव्यात सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेसाठी जिंगपिंग भारतात दाखल झाले आहेत. जिंगपिंग ब्रिक्स परिषदेत दाखल होण्याआधी एनएसजी आणि मसूद अजहरबद्दलच्या भूमिकेत काडीमात्र बदल झाला नसल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. ‘भारत आणि चीनचे संबंध उत्तम स्थितीत आहेत. मात्र काही मुद्यांवर दोन्ही देशांचे मतभेद आहेत. मात्र चीनने एनएसजी आणि अजहरच्या भूमिकेत चीनने कोणताही बदल केलेला नाही’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी स्पष्ट केले आहे.

‘मी चीनची भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्राची समिती त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करेल’, अशा शब्दांमध्ये गेंग शुआंग यांनी मसूद अजहरवरील बंदीच्या प्रश्नाचे उत्तर दिले. अजहर हा पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे. मसूद अजहरवर बंदी घालण्याबद्दल सर्व देशांचे एकमत झालेले नाही. त्यामुळे चीनने अजहरवर बंदी घालण्याची भूमिका घेतली नसल्याचे शुआंग यांनी म्हटले आहे.

अणू पुरवठादार देशांच्या गटातील भारताच्या समावेशाबद्दलची चीनची भूमिका स्पष्ट असल्याचे गेंग शुआांग यांनी म्हटले आहे. चीनचे उपपरराष्ट्र मंत्री ली बाओडाँग यांनी या मुद्यावर सर्व देशांचे एकमत होणे आवश्यक असल्याची भूमिका ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केली होती. बाओडाँग यांच्या याच वक्तव्याची आठवण शुआंग यांनी करुन दिली. भारताच्या एनएसजी प्रवेशाविषयी एनएसजीमधील ४८ देशांचे एकमत होणे आवश्यक आहे, असे शुआंग यांनी म्हटले आहे.

मसूद अजहर आणि एनएसजी या दोन्ही प्रकरणात खोडा घालणाऱ्या चीनने दोन्ही देशांचे संबंध उत्तम स्थितीत असल्याचे म्हटले आहे. ‘दोन्ही देशांचे संबंध सकारात्मक आहेत. दोन्ही देशांमधील संवादाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक वादांवर तोडगा काढता येईल’, अशी अपेक्षा शुआंग यांनी व्यक्त केली आहे.