सिक्कीम मधला तणाव थांबताना दिसत नाहीये. चीनने भारतात सिक्कीममार्गे घुसखोरी केली आहे. चीनच्या सैनिकांना हटविण्याचे काम सुरू आहे. भारतीय सैनिकांपुढे हे मोठे आव्हान आहे. मात्र अशातच चीने एक नवा नकाशा समोर आणला आहे, या नकाशात भारत-चीन आणि भूतान या तीन देशांच्या त्रिकोणी सीमेजवळ चीने भूतानच्या काही भागांवर कब्जा केला आहे. या नकाशात चीनने निळ्या रंगाचा एक बाण दाखवून भूतानच्या सीमेवर कब्जा केल्याचे दाखवून दिले आहे. सध्या डोकलाम भागात भारतीय सैनदल आले आहे, डोका हा भूतानचा भाग मानला जातो मात्र चीनने यावर आपला कब्जा असल्याचे म्हटले आहे.

चीनने नवा नकाशा शुक्रवारीच समोर आणला आहे, डोका हा भाग चीनमधल्या व्यापाऱ्यांचे मुख्य ठिकाण आहे, त्यावर भारतीय सैन्यदलाने अतिक्रमण केले आहे असे चीनने म्हटले आहे. १८९० मध्ये ब्रिटीश आणि चीन यांच्यात झालेल्या करारानुसार डोकलाम भाग आमचाच आहे असे चीनने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच चीनच्या सैनिकांनी भारतात प्रवेश करून भारताच्या दोन छावण्या उद्धवस्त केल्या होत्या. या चीनच्या सैनिकांना रोखण्यासाठी भारतीय सैन्यदलाने मानवी साखळी तयार केली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून डोकामध्ये तणाव आहे. भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेल्या सीमारेषेदरम्यान डोका हा भाग येतो. या ठिकाणी भारत आणि चीन या दोन्ही देशांनी आपले सैन्य तैनात केले आहे. मात्र कोणीही माघार घ्यायला तयार नाही. चीनकडून घुसखोरी होण्याआधी दोन्ही देशांच्या सैन्यदलांमध्ये फ्लॅग मिटींगही झाली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून आले आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर चीनने नवा नकाशा आणला आहे. ज्यात भूतानमध्ये असलेला डोका भाग हा आपलाच असल्याचा दावा करण्यात आला आहे.