भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाबाबत दोन्ही देशांना मान्य होईल, असा तोडगा अद्याप निघालेला नाही. सीमारेषा चीनला अमान्य असून, प्रत्यक्ष ताबारेषेजवळ चिनी सैन्याने जमवाजमव केली आहे. मात्र, चीनच्या कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास भारत समर्थ आहे, अशी भूमिका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत मांडली.

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर चीनशी सुरू असलेल्या संघर्षांचे पडसाद देशभर उमटत असून, या संदर्भातील वस्तुस्थिती संसदेत मांडण्याची मागणी विरोधकांनी केली होती. या विषयावर संरक्षणमंत्र्यांनी निवेदन सादर केले. ‘‘चिनी सैनिकांनी हिंसक कृतींद्वारे आतापर्यंतच्या सर्व करारांचे उल्लंघन केले आहे. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबारेषा आणि नजीकच्या भागांमध्ये चीनने लष्करी जमवाजमव केली, दारुगोळाही जमा केला. पूर्व लडाख, गोग्रा, काँग्का ला, पेंगाँग सरोवराचा उत्तर व दक्षिण काठ ही संघर्षांची प्रमुख ठिकाणे आहेत. या भागात भारतानेही सैन्य वाढवले आहे’’, असे राजनाथ यांनी सांगितले.

‘‘भारत आणि चीनच्या द्विपक्षीय संबंधांसाठी सीमा परिसरात शांतता आणि सौहार्द राखले गेले पाहिजे, यावर दोन्ही देश सहमत आहेत. परंपरा आणि प्रथेने निर्माण झालेले सीमासंरेखन चीनला अमान्य आहे. मात्र, ती भौगोलिक तत्त्वांवर आधारलेली आहे, असे भारत मानतो. सीमेवर ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवणे गरजेचे असून, ती बदलण्याचा कुठलाही प्रयत्न उभय देशांदरम्यानच्या करारांचे उल्लंघन ठरेल, असे राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून स्पष्टपणे चीनला बजावले आहे’’, असे राजनाथ यांनी सांगितले. ‘‘पूर्व लडाखमध्ये सीमारेषेच्या व्यवस्थापनाबाबत भारतीय सैन्यदलाने नेहमीच जबाबदारीची जाणीव ठेवली आहे. पण, देशाचे सार्वभौमत्व आणि भौगोलिक एकात्मिकता राखण्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे चीनच्या संरक्षण मंत्र्यांशी झालेल्या बैठकीत स्पष्टपणे सांगितले आहे’’, असे राजनाथ यांनी अधोरेखित केले.

देशाचे सैन्यदल मानसिकदृष्टय़ा कणखर असून, त्याबाबत कोणीही शंका घेऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन जवानांची भेट घेतली होती. संपूर्ण देश जवानांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश त्यांना पोहोचला आहे. याआधीही सीमेवर दोन्हीकडील सैनिक आमनेसामने उभे ठाकले होते. पण, प्रत्येकवेळी चर्चेच्या मार्गाने तणाव दूर करण्यात आला. यावेळी मात्र दोन्ही सैन्यामध्ये धुमश्चक्री झाली आणि संघर्ष तीव्र झाला.

चीनशी असलेला वाद शांततेने सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी सीमारेषांवर तैनात जवानांच्या पाठिशी आपण सगळे उभे आहोत, हे दर्शवणारा ठराव लोकसभेत मंजूर करावा, असे राजनाथ यांनी सुचवले. राजनाथ सिंह यांनी केलेल्या निवेदनानंतर बोलू देण्याची विनंती विरोधकांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली. अध्यक्षांनी ती अमान्य केली. त्यामुळे काँग्रेसने सभात्याग केला.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अलिकडेच रशियाचा दौरा केला असून चीनच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. या पाश्र्चभूमीवर राजनाथ सिंह यांचे लोकसभेतील निवेदन चीनच्या आक्रमकतेला दिलेला सज्जड इशारा असल्याचे मानले जात आहे.

गलवानमध्ये चीनचीही मनुष्यहानी

गलवान खोऱ्यात १५ जूनला चिनी सैनिकांनी हिंसाचार घडवला. या धुमश्चक्रीत सीमेचे रक्षण करताना आपले २० जवान शहीद झाले. मात्र, या संघर्षांत चिनी सैन्यदलाचेही मोठे नुकसान झाले, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

लडाखमधील ३८,००० चौ. किमी भूभागावर चीनचा ताबा

लडाखमधील अंदाजे ३८,००० चौरस किलोमीटर भूभागावर चीनचा बेकायदा ताबा कायम आहे. तसेच चीन-पाकिस्तान यांच्यातील १९६३ च्या कथित सीमा करारानुसार पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील ५,१८० चौरस किलोमीटर जमीन चीनला दिली आहे, याकडेही राजनाथ यांनी लक्ष वेधले.

चीन सीमावाद शांततेच्या मार्गाने सोडवला पाहिजे, असे भारताचे मत आहे. मात्र, देशाच्या सार्वभौमत्वाला आणि भौगोलिक एकतेला बाधा आणण्याचा कोणताही प्रयत्न आक्रमकपणे मोडून काढला जाईल.

– राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

देश सैन्यदलाच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा असून, यापुढेही राहील. पण, मोदीजी, तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहाल? आपली जमीन चीनकडून परत कधी मिळवणार?

राहुल गांधी, कॉंग्रेस नेते