दिवसभरात सात बळी; नवे रुग्ण आठ, एकूण मृतांची संख्या ३,१७६

बीजिंग : चीनमध्ये गुरुवारी करोना विषाणूने सात बळी गेले असून मृतांची एकूण संख्या ३१७६ झाली आहे. नवीन निश्चित रुग्णांची संख्या केवळ आठ होती. संपूर्ण देशात सीओव्हीआयडी १९ विषाणूचा भर ओसरला आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, चीनमध्ये गुरुवारी सात जण विषाणूने मरण पावले तर त्यातील सहा जणांचा वुहानमध्ये मृत्यू झाला तर एक शांगडॉंगमध्ये मरण पावला. आठ नवीन रुग्ण हुबेई प्रांतातील आहेत. देशात ३३ नवीन संशयित रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या आता १४७ झाली आहे.  गुरुवारी  १३१८ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. एकूण गंभीर रुग्णांची संख्या आता ४०२० आहे. चीनमध्ये एकूण ८०८१३ निश्चित रुग्ण असून त्यात मरण पावलेल्या ३१७६ जणांचा समावेश आहे. १३५२६ रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. ६४१११ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तीन नवीन रुग्ण परदेशातून आले असून त्यात दोन शांघाय तर एक बीजिंगमध्ये आहे. परदेशातून आलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता  ८८ झाली आहे. हाँगकाँगमध्ये दोन मृत्यू १३१ निश्चित रूग्ण, मकावमध्ये १० निश्चित रूग्ण, तैवानमध्ये १ बळी व ४९ रुग्ण अशी परिस्थिती आहे.

आरोग्य आयोगाचे प्रवक्ते मी फेंग यांनी सांगितले की, करोना विषाणूच्या साथीचा भर ओसरला आहे. नवीन रुग्णांची संख्या कमी झाली असून जगात मात्र रुग्ण व बळी वाढत चालले आहेत. चीनला या विषाणूशी तीन महिने संघर्ष करावा लागला. वुहानमध्ये डिसेंबरमध्ये हा विषाणू सापडला होता. त्यानंतर २३ जानेवारीपासून तेथील सरकारने गांभीर्याने उपाययोजना केल्या. ५ कोटी लोकसंख्या असलेले हुबेई राज्य हे करोनाचे मुख्य ठिकाण होते. १२ फेब्रुवारीपर्यंत दैनंदिन रुग्णांचा आकडा १५ हजारांपर्यंत गेला होता. बहुतांश लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले होते. १२ हून अधिक शहरे बंद करण्यात आली होती.

गतवर्षी नोव्हेंबरपासूनच लागण

बीजिंग : चीनमध्ये करोनाचा नवीन सीओव्हीआयडी १९ हा विषाणू गतवर्षी १७ नोव्हेंबरलाच हुबेई प्रांतात सापडला होता, पण त्यावेळी त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे नंतर तो फार वेगाने देशात व परदेशात पसरत गेला, असे प्रसारमाध्यमांच्या बातम्यात म्हटले आहे.

हाँगकाँगच्या  साऊथ चायना मॉर्निग पोस्ट या वृत्तपत्राने म्हटले आहे की, चिनी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत २०१९ मध्ये संसर्ग झालेले २६६ जण शोधले असून ते कधी ना कधी वैद्यकीय देखरेखीखाली होते. चीनमध्ये सीओव्हीआयडी १९ विषाणूचा पहिला रुग्ण हा १७ नोव्हेंबरला सापडला होता. हुबेई प्रांतात सापडलेला हा पहिला रुग्ण ५५ वर्षांचा होता व त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. दी लॅन्सेटमध्ये प्रकाशित एका शोधनिबंधात वुहानच्या जिनयिंटान रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटले होते की, पहिला रुग्ण १ डिसेंबरच्या आसपास सापडला. डॉ. ए फेन यांच्या मते वुहान मध्यवर्ती रुग्णालयात पहिला रुग्ण १६ डिसेंबरला सापडला.

अमेरिका-चीन यांच्यात जुंपली

१७ नोव्हेंबरला पहिला रुग्ण सापडल्याच्या बातमीवरून चीन व अमेरिका यांच्यात विषाणूच्या स्रोतावरून खडाजंगी झाली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी असा आरोप केला की, हा विषाणू अमेरिकी लष्करानेच वुहानमध्ये आणला. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेचे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी त्याआधी  सांगितले की, काही फ्लू रुग्णांचे निदान चुकीचे करण्यात आले असावे प्रत्यक्षात तो करोनाचा रुग्ण होता. झाओ यांनी म्हटले आहे की, अमेरिकेची  सीडीसी ही संस्था आता रंगेहात पकडली गेली आहे. अमेरिकेत रुग्ण -० अवस्था केव्हा सुरू झाली. किती लोकांना संसर्ग झाला होता. रुग्णालयांची नावे काय होती याची उत्तरे अमेरिकेने द्यावीत. वुहानमध्ये अमेरिकी लष्करानेच हा विषाणू आणला. माहितीत पारदर्शकता असली पाहिजे. माहिती जाहीर करा, अमेरिकेने आता स्पष्टीकरण केले पाहिजे. अमेरिकी लष्कराचा यात काय संबंध याचा खुलासा चीनने केलेला नाही.

सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांचा निषेध करताना म्हटले होते की, करोना विषाणूला त्यांनी ‘वुहान विषाणू’ म्हटले होते. त्यांचे हे वर्तन बेजबाबदारपणाचे होते व त्यांनी चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न केला.

जगभरात ५,०४३ बळी

पॅरिस : करोना विषाणूमुळे जगभरात मरण पावलेल्यांची संख्या पाच हजारावर गेली आहे. एकूण ५०४३ जणांचा मृत्यू झाला असून त्यात चीनमधील ३१७६ जणांचा समावेश आहे. इराणमध्ये ५१४, तर इटलीत १०१६ जण मरण पावले आहेत. सीओव्हीआयडी १९ विषाणू प्रथम डिसेंबरमध्ये आढळून आला होता व आता १२१ देशातील १३४३०० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे.