08 March 2021

News Flash

चीनमध्ये पुन्हा पसरतोय करोना; ५० लाख करोना टेस्ट अन् लॉकडाउनची तयारी

मार्चनंतर पहिल्यांदाच वाढले करोनाबाधित रुग्ण

चीनमधील एका मोठ्या शहरामध्ये ५० लाख नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात येणार आहेत. या संपूर्ण भागामध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. चीनच्या पश्चिमेकडील शिनजियांगजवळील काशगरमध्ये या चाचण्या करण्यात येणार आहे. या भागामध्ये लक्षणं न दाखवणारे अनेक रुग्ण आढळून येत असल्याने एवढ्या मोठ्याप्रमाणात चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चाचण्यांना सुरुवात करण्यात आल्यापासून १३७ करोनाबाधित आढळून आले आहेत. झिंजियांगमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचं सांगितलं आहे. एका कापड कारखान्यातील १७ वर्षीय तरुणी करोनाबाधित आढळून आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. मात्र या मुलीला करोनाचा संसर्ग कसा झाला यासंदर्भातील तपास आरोग्य अधिकारी करत असल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

रविवारी दुपारपर्यंत चीनमधील या भागातील २८ लाखांहून अधिक नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारपर्यंत या भागातील ४७ लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण करण्यात येतील अशी अपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांना आहे.

जगभरामध्ये करोनाचा फैलाव सुरु झाला त्या मार्च महिन्यामध्येच चीनला करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आलं. त्यानंतर जवळजवळ सात महिन्यांनी शिनजियांगजवळच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. म्हणूनच आता आरोग्य विभागाने या भागातील प्रत्येक नागरिकाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागामध्ये प्रामुख्याने एक कोटीहून अधिक उइगर मुस्लीम राहतात. या भागामध्ये मोठ्याप्रमाणात उइगर मुस्लिमांना वेगवेगळ्या छावण्यांमध्ये बंद करुन ठेवण्यात आल्याचा अमेरिकन परराष्ट्र विभागाचा अंदाज आहे.

मेन लॅण्ड चायनामध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आतापर्यंत पाहाला मिळालेलं नाही. मात्र भविष्यात करोनाची दुसरी लाट येऊ शकते या शक्यतेनुसार चीनने मोठ्याप्रमाणात चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मेन लॅण्ड चायनामध्ये आतापर्यंत ८५ हजार ८०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत तर मृतांची संख्या ही चार हजार ६०० हून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 1:49 pm

Web Title: china reports surge in symptomless covid 19 infections scsg 91
Next Stories
1 अमेरिकेच्या परराष्ट्र, संरक्षण मंत्र्यांसोबत NSA डोवाल यांची महत्त्वाची बैठक
2 मराठा आरक्षणाची सुनावणी काही काळासाठी तहकूब
3 जगभरातील मुस्लीम देशांकडून का होतेय फ्रान्समधील उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी?
Just Now!
X