आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे (इंटरपोल) माजी प्रमुख मेंग हाँगवेई यांची लाच घेतल्याबद्दल आणि इतर गुन्ह्यासंबंधी चौकशी केली जाणार असल्याचे समजते. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. दरम्यान, हाँगवेई यांच्या राजीनाम्यानंतर दक्षिण कोरियाचे उपप्रमुख किंम जोंग यांग यांची इंटरपोलच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंटरपोल प्रमुखावर लाच घेतल्याचा आरोपावरुन जगभरात खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी हाँगवेई हे काही दिवस गायब होते. नंतर चीन पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतल्याचे समोर आले होते.

फ्रान्सच्या कार्यालयातून बाहेर पडताना हाँगवेई बेपत्ता झाले होते. त्याच्या अशा अचानक बेपत्ता होण्यामागे अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत होते. अखेर चीनने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समोर आले होते. हाँगवेई यांनी लाच घेतल्याचा तसेच इतर गुन्हेगारीविषयक कृत्यात सहभागी असल्याचा चीनचा आरोप आहे.

दरम्यान, हाँगवेई बेपत्ता होण्यापूर्वी मोबाइलवर मिळालेल्या एका संदेशाची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. या संदेशात चाकूची इमोजी पाठवण्यात आली होती. विशेष म्हणजे हाँगवेई हे २९ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांची पत्नी त्यांच्याशी संपर्क साधू शकलेली नाही.

फ्रान्समधील लियॉन शहरात पत्रकार परिषदेत ग्रेस मेंग यांनी हे प्रकरण आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. हाँगवेई यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप त्यांनी केला होता. फ्रान्स सरकारने याप्रश्नी मध्यस्थी करावी, असे अपील देखील त्यांनी केले. हाँगवेई हे २०१६ मध्ये इंटरपोलचे अध्यक्ष झाल्यापासून पत्नी आणि दोन मुलांबरोबर फ्रान्समधील लियॉन शहरात राहत होते.