चीनमधील शिनझेन शहरामधील ग्राहकांनी फ्रोझन फूड म्हणजेच गोठवलेले अन्नपदार्थ घेताना जास्त काळजी घ्यावी असं स्थानिक प्रशासनाने म्हटलं आहे. ब्राझीलमधून आयात करण्यात आलेल्या चिकन विंग्समध्ये करोनाचे विषाणू आढळून आल्यानंतर प्रशासनाने एक पत्रक जारी केलं आहे. यामध्येच नागरिकांनी फ्रोझन फूड खरेदी करताना जास्त काळजी घ्यावी असं म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त ब्लूमबर्गने दिलं आहे.

शिनझेनमध्ये आयात करण्यात आलेल्या चिकन विंग्समधील मांसाच्या चाचण्यांदरम्यान त्यामध्ये करोनाचे विषाणू आढळून आले आहेत. ब्राझीलमधील सॅण्टा कार्टारिना शहरामधील अरोरा अॅलिमोन्टोज येथील कारखान्यामधून आयात करण्यात आलेल्या मांसांमध्ये करोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या कारखान्याच्या नोंदणी क्रमांकासहीत सर्व माहिती स्थानिक प्रशासनानेच दिली आहे. या प्रोडक्टबरोबर आलेल्या सर्वच पाकिटांमधील मांसाची चाचणी करण्यात आली आहे. तसेच या आयातीसंदर्भातील सर्व कर्मचाऱ्यांचीही करोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटीव्ह आली आहे असं स्थानिक प्रशासनाने म्हटलं आहे.

मासळीच्या पाकिटावर आढळून आले विषाणू

काही दिवसांपूर्वीच चीनच्या पूर्वेकडील यानताई बंदरामध्ये आयत करण्यात आलेल्या मासळीच्या पाकीटांवर करोनाचे विषाणू आढळून आल्याने एकच खबळ उडाली होती. डालियान शहरामधून आलेल्या मासळीच्या पाकिटांवर हे विषाणू आढळून आल्याने स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. फ्रोजन फूड प्रकारातील मासळीच्या पाकीटांवर हे विषाणू आढळून आल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं होतं.

चीनच्या ईशान्येकडील लायऑनिंग प्रांतातील डालियान हे मोठं बंदर आहे. जुलै महिन्यामध्ये या बंदरामध्ये आयात करण्यात येणाऱ्या मासळीपैकी शिंपल्यांच्या पाकीटांवर करोनाचे विषाणू आढळून आले होते. इक्वाडोअर या देशामधून आलेल्या पाकिटांवर करोना विषाणू आढळून आल्यानंतर चीनने या देशातून मासळी आयात करण्यावर बंदी घातली होती. या देशातील तीन कंपन्यांच्या माध्यमातून चीनमध्ये मासळी आयात केली जात होती. चीनमधील वुहान येथील मासळी बाजारामधूनच करोनाचा मानवाला संसर्ग झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच मासळीच्या पाकीटांवरच करोनाचे विषाणू आढळून आल्याने प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याचा निर्णय घेत खबरदारीचा उपाय म्हणून आयात बंद केली आहे. वुहानमधून करोना विषाणूचा जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये संसर्ग झाला आहे. सध्या या विषाणूवर प्रभावी लस शोधण्यासाठी जगभरामध्ये १०० हून अधिक ठिकाणी चाचण्या आणि प्रयोग सुरु आहेत.