भारताला आण्विक पुरवठादार गटाचे ( एनएसजी) सदस्यत्त्व न देण्याच्या भूमिकेवर आम्ही अजूनही ठाम असल्याचे चीनकडून स्पष्ट करण्यात आले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी गुरूवारी बीजिंगमध्ये पत्रकारांशी बोलताना याविषयीची भूमिका स्पष्ट केली. काही दिवसांपूर्वीच रशियाचे उप-परराष्ट्र मंत्री सर्जी रॅबकोव्ह यांनी भारताला NSGचे सदस्यत्त्व मिळवून देण्यासाठी चीनशी चर्चा करू, असे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर चीनकडून हे वक्तव्य करण्यात आले. विविध देशांच्या सरकारांमध्ये पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने चर्चा होऊन एकमताने निर्णय घेतला जाण्याच्या NSGच्या कार्यपद्धतीला चीनचा पाठिंबा असल्याचेही गेंग शुआंग यांनी सांगितले.

भारत ‘एमटीसीआर’चा पूर्णवेळ सदस्य, वाचा काय आहे …

आण्विक पुरवठादार गटाचा महत्त्वपूर्ण सदस्य असलेला चीन सातत्याने भारताला या गटात घेण्याला विरोध करत आहे. भारताने अण्वस्त्रप्रसार करारावर स्वाक्षरी केली नसल्यामुळे आपला भारताच्या सदस्यत्त्वाला विरोध असल्याचे चीनचे म्हणणे आहे. एनएसजीचे सदस्यत्त्व मिळवण्यासाठी गटातील ४८ देशांपैकी प्रत्येक सदस्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे. या एका नियमामुळे चीनने गेल्या अनेक वर्षांपासून भारताचा NSG मधील प्रवेश रोखून धरला आहे.