“चीन बोलतो तसं वागत नाही तसेच द्विपक्षीय कराराचा चीनने आदर केला नाही” असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. “मे महिन्यात लष्करी चर्चा सुरु असताना चीनने पश्चिम सेक्टरमध्ये अनेकदा नियंत्रण रेषेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला” असे राजनाथ सिंह म्हणाले. ते लडाख सीमेवरील स्थिती संदर्भात राज्यसभेत बोलत होते.

“द्विपक्षीय करारातील तरतुदी आणि प्रोटोकॉलनुसार ग्राऊंड कमांडर्स परिस्थिती हाताळत असताना, मे महिन्यात पश्चिम सेक्टरमध्ये चीनने अनेकदा नियंत्रण रेषेवर अतिक्रमणाचा प्रयत्न केला” अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. “आपल्या सैन्यदलाने वेळीच नियंत्रण रेषेवर ठोस कारवाई करुन हे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. चीनच्या बोलण्यात आणि कृती करण्यात फरक आहे ” असे राजनाथ सिंह म्हणाले.

“चीनच्या कृतीमधून ते द्विपक्षीय कराराचा अनादर करतात हे दिसून येते. चीनकडून जी सैन्याची जमवाजमव सुरु आहे, ते १९९३ आणि १९९६ च्या कराराचे उल्लंघन आहे. एलएसीचा आदर हा सीमा भागात शातंता आणि स्थिरता राखण्याचा आधार आहे” असे राजनाथ सिंह म्हणाले.

“सीमा भागात सैन्य तैनातीची क्षमता वाढवण्यासाठी चीनने मागच्या काही दशकात सीमेजवळ मोठया प्रमाणावर पायाभूत बांधकामे केली आहेत. आपल्या सरकारने सुद्धा सीमाभागात पायाभूत सुविधांच्या उभारणींसाठी बजेटमध्ये मोठी वाढ केली आहे” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.