पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील दौऱ्यात मेक इन इंडिया योजनेत चिनी उद्योगपतींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांची पाठ फिरताच भारताशी उत्पादन क्षेत्रात स्पर्धा करण्यासाठी चीनने मेड इन चायना २०२५ हा दहा वर्षांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या योजनेचा आराखडा तयार करण्यात आला असून चीनला जगात उत्पादन क्षेत्रावर महाशक्ती करण्याचा त्यांचा उद्देश आहे. या योजनेला पंतप्रधान ली केक्वियांग यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. चीनमधील कारखाने मागणीअभावी अडचणीत आहेत, इतर विकनशील अर्थव्यवस्थांकडून स्पर्धा आहे व देशांतर्गत अर्थव्यवस्था घसरत आहे त्या पाश्र्वभूमीवर चीनने सावरण्याचे प्रयत्न चालवले आहेत. चिनी अधिकाऱ्यांच्या मते दीर्घकालीन विचार करता मेक इन इंडिया व मेक इन चायना यांच्यात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठई स्पर्धा होण्याची शक्यता आहे. उत्पादन क्षेत्रासाठी आणखी दोन योजना चीन जाहीर करणार असून २०४९ पर्यंत चीनला उत्पादन क्षेत्रात शिखरावर नेण्याचे प्रयत्न आहेत.