नवी दिल्ली : चीनने पूर्व लडाखमध्ये भारताच्या चारडिंग नाला भागात तंबू उभारले असल्याचे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. या तंबूंमध्ये राहणारे लोक तथाकथित नागरिक असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भारताने त्यांना परत जाण्यास सांगूनही ते परत गेलेले नाहीत, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

भारतीय लष्कर आणि चीनच्या सैन्यात डेमचोक येथे अनेकदा चकमकी झाल्या होत्या. त्यानंतर दोन्ही देशांनी डेमचोक आणि ट्रिग हाइटस ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ठिकाणे वादग्रस्त असल्याचे १९९० मध्ये संयुक्त कार्यकारी गटाच्या (जेडब्ल्यूजी) चर्चेत मान्य केले होते. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांना नकाशांचेआदानप्रदान केले होते. त्यात समर लुंगपा, देपसांग बल्ज, पॉइंट ६५५६, चांगलुंग नाला, कोंगका ला, पँगाँग सरोवराचा उत्तर किनारा, स्पँगूर, माऊंट साजून, डुमचेले, चुमार या भागांबाबत मतभेद व्यक्त करण्यात आले होते.

या बारा भागांशिवाय प्रत्यक्ष नियंत्रण रेषा नेमकी कुठे आहे, याबाबतही मतभेद आहेत. तसेच दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षभरात पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर संघर्षांच्या आणखी पाच ठिकाणांची भर पडली आहे. केएम १२०, गलवान खोरे, पीपी १५, पीपी १७ ए ही शोक सुला भागातील ठिकाणे तसेच रेशिन ला व रेझांग ला या नव्या ठिकाणी दोन्ही देशांमध्ये संघर्ष होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाखमध्ये मे २०२० पासून संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या वरिष्ठ लष्करी अधिकारी पातळीवरील वाटाघाटीत पूर्व लडाखमधून सैन्यमाघारीबाबत चर्चा झाली होती; परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती फारशी फलदायी ठरली नाही. वादग्रस्त भागांतून भारतानेही सैन्य मागे घ्यावे, असा चीनचा आग्रह आहे.

वरिष्ठ लष्करी अधिकारी पातळीवरील चर्चा होत आहे. तसेच दोन्ही देशांत हॉटलाइन संपर्कही सुरू  करण्यात आलेला आहे. दौलत बेग ओल्डी आणि चुशुल येथे दोन्ही देशांनी एकमेकांना १५०० वेळा संदेश पाठवले आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सध्या सैन्यमाघारीबाबत दोन्ही देशांमध्ये मतैक्य आहे, परंतु चीनला वाटाघाटी हव्या आहेत, त्यासाठी वेळ लागणार आहे. विश्वासाचा अभाव असल्यानेच तोडगा काढण्यात विलंब होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीन दर दहा दिवसांनी सैन्याची हालचाल करीत आहे. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्य वेगवेगळ्या ठिकाणी लष्करी पायाभूत सुविधा तयार करीत आहे. अगदी आतल्या भागात बरेच चिनी सैन्य ‘जी २१९’ महामार्गानजीक तैनात आहे. हा महामार्ग अक्साई चीनमधून शिनजियांग आणि तिबेटला जोडतो.

भारतानेही संरक्षण क्षमता वाढवली असून पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. हिवाळ्यात दोन्ही देशांनी मोठय़ा प्रमाणावर सैन्य पँगॉग त्सो किनाऱ्यावर तसेच कैलाश पर्वतराजीत आणले होते. फेब्रुवारीत दोन्ही देशांनी सैन्यमाघारीस सुरुवात केली. ‘रेझांग ला’ आणि ‘रेशीन ला’पासून सैन्य काहीशे मीटर मागे घेण्यात आले आहे.

चीनला स्पष्ट संदेश : वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार भारताने सर्व महत्त्वाच्या ठिकाणी लष्कर तैनात केले आहे. चीनने पुन्हा कैलास पर्वतराजीतील टेकडय़ांवर घुसखोरी केल्यास आम्ही तेथे जाऊ. चीनने आगळिकीचा प्रयत्न केलाच तर संघर्ष तीव्र होईल, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.

चर्चेची तारीख अनिश्चित

’दोन्ही देशांतील वरिष्ठ लष्करी अधिकारी किंवा राजनैतिक पातळीवरील चर्चेची पुढची तारीख अद्याप ठरलेली नाही.

’चीनने वरिष्ठ लष्करी अधिकारी पातळीवर चर्चेसाठी २६ जुलै तारीख दिली होती, पण तो पाकिस्तानविरोधातील कारगिल युद्धाचा विजय

दिवस असल्याने चर्चा लांबणीवर टाकण्यास भारताने सांगितले होते.

’आता ही चर्चा ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी वरिष्ठ लष्करी अधिकारी पातळीवरील चर्चा एप्रिलमध्ये झाली होती.

फेब्रुवारीपासून घुसखोरी नाही!

सध्या परिस्थिती स्थिर आहे, परंतु २०१९ ला जी स्थिती होती तशी नाही. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत परिस्थिती खूप चांगली आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनने फेब्रुवारीपासून घुसखोरी केलेली नाही. शिवाय दोन्ही सैन्यांत चकमकही झालेली नाही. दोन्ही देशांचे सैन्य सध्या कुठेही एकमेकांच्या समोरासमोर नाही. दोन्ही देशांचे ५० हजार सैनिक पूर्व लडाखमध्ये तैनात आहेत.