03 August 2020

News Flash

चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी आणि बांधकामे थांबवावी!

भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांचा इशारा

परिस्थिती 'जैसे थे' होत नाही तो पर्यंत नियंत्रण रेषेजवळ सध्याची लष्करी तटबंदी कायम राहिल असे भारतीय अधिकाऱ्यांनी हिंदुस्थान टाइम्सला सांगितले आहे.

 

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती सुधारण्यासाठी चीनने वेळोवेळी घुसखोरी करून तेथे नवीन पायाभूत सुविधा उभारण्याचे बंद करावे, असा इशारा भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी दिला आहे.

सैन्य माघारी घेऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर माघारी जाण्याच्या जबाबदारीचे भान चीनने ठेवावे असे सांगून ते म्हणाले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी करून नवीन बांधकामे करण्याचे चीनने आता बंद करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन सीमेवरील वादावर जे भाषण केले होते त्याच्या एकदम विरोधी बाबी भारताच्या राजदूतांनी मांडल्या. मिस्री यांनी सांगितले की, भारतीय सैन्याच्या नेहमीच्या गस्तीच्या कामात चीनची सैन्यदले नेहमी अडथळे आणतात. गलवान भागातील प्रदेशावर चीनने केलेला दावा समर्थनीय नसल्याचे सांगून त्यांनी म्हटले आहे की, भारत सरकारने वेळोवेळी हे सांगूनही फरक पडत नसल्याने परिस्थिती चिघळत असून असे अतिरंजित दावे करून परिस्थिती सुधारण्यास मदत होणार नाही. चीनने घुसखोरी व भारतीय बाजूला येऊन बांधकामे करणे थांबवावे. आतापर्यंत वेळोवेळी चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत घुसून कारवाया केल्या आहेत. हे प्रकार थांबवले तरच दोन्ही देशातील लष्करी तिढा संपू शकतो. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सीमेवर शांतता व स्थिरता असली पाहिजे असे आम्हाला वाटते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन सीमेवरील वादावर बैठकीवेळी जे भाषण केले होते त्याच्या एकदम विरोधी बाबी भारताच्या राजदूतांनी मांडल्या असून पंतप्रधानांनी चिनी सैन्याने भारतीय प्रदेशात घुसखोरी केलीच नसल्याचे म्हटले होते. कुणीही भारतीय प्रदेशात आलेले नाही, भारताची कुठलीही छावणी ताब्यात घेतली गेलेली नाही असे ते म्हणाले होते. भारताच्या राजदूतांनी मात्र चीनने घुसखोरी केल्याने व सीमेवर पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न वारंवार चालू ठेवल्याने सीमेवर अशांतता असल्याचे ठणकावून सांगितले.

लष्करप्रमुखांची संरक्षणमंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली : लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन चीनलगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सध्याच्या  परिस्थितीची माहिती दिली.

लष्करप्रमुखांनी संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत, हवाई दल प्रमुख व नौदल प्रमुख यांच्याशी सीमेवरील परिस्थितीबाबत चर्चा केली. लष्करप्रमुख नरवणे यांनी मंगळवारी पूर्व लडाखमधील ज्या भागात चिनी सैन्याने हिंसाचार व घुसखोरीचा प्रयत्न केला, त्या भागास भेट देऊन गलवान खोऱ्यातील परिस्थितीचाही आढावा घेतला होता. चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यासाठी सरकारवर दबाव वाढत असताना लष्करप्रमुखांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सरकारला व्यूहरचना करणे सोपे जाणार आहे.  भारताने सीमेवर कुमक वाढवली असली, तरी चीननेही त्यांची लष्करी सामग्री हलवलेली नाही, असे उपग्रह छायाचित्रातून दिसून आले आहे. दिल्लीतील  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सुरू असलेला पेच डोकलामपेक्षा गंभीर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 12:28 am

Web Title: china should stop infiltration and construction on indian border abn 97
Next Stories
1 देशात, राज्यात रुग्णवाढीचा उच्चांक
2 आदित्यनाथांमुळे ८५ हजार लोकांचे प्राण वाचले!
3 ‘चीनने बळकावलेला भूभाग कधी परत मिळवणार?’
Just Now!
X