जगात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा फैलाव हा पहिल्यांदा चीनमधूनच झाल्याचा दावा केला जातो. त्या चीनने आता या आजाराच्या संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. त्याचबरोबर चीनने सोमवारी पेइचिंग ट्रेड फेअरमध्ये करोना विषाणूवरील आपली पहिली लस जगासमोर सादर केली. चीनच्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप सुरु असून या वर्षाच्या शेवटी ही लस बाजारात दाखल होऊ शकते.

चीनच्या सिनोवेक बायोटेक आणि सिनोफॉर्म या कंपन्यानी मिळून ही लस तयार केली आहे. सिनोवेक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “आमच्या कंपनीने सुरुवातीपासूनच ही लस तयार करण्यासाठी एक फॅक्टरी तयार केली आहे. या फॅक्टरीत दरवर्षी लसीचे ३०० मिलियन डोस बनवण्याची क्षमता आहे. पेईचिंग ट्रेड फेअरमध्ये चीनने सोमवारी ही लस सादर केली, यावेळी चीनने तयार केलेली पहिलीच लस पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

जगातील १० लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात

चीनने ज्या करोना विषाणूवरील लस सादर केली आहे. ही लस जगातील त्या १० लसींमध्ये समाविष्ट आहे जे आपल्या क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. यावेळी जवळपास सर्वच देश करोना विषाणूच्या संक्रमणापासून बचावासाठी आणि आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ज्यावेळी कोणतीही लस यशस्वी झाल्याचे सिद्ध होईल, त्या लसीलाच पहिल्यांदा मान्यता देण्यात येणार आहे.

करोना पसरवल्याप्रकरणी टीका झेलतोय चीन

चीनवर जगभरात हा आजार पसरवल्याचा आरोप केला जात आहे. त्याचमुळे चीन आता करोना विषाणूची लस विकसित करण्यासाठी वेगाने पावलं उचलत आहे. दरम्यान, चीनने अंतिम चाचणीच्या आधीच लोकांना लसीचा डोस दिल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं शनिवारी याबाबत खुलासा करताना सांगितलं होतं की, ते २२ जुलैपासूनच आपल्या नागरिकांना या लसीचा डोस देत आहेत.