चीनमधील हवाई वाहतूक नियामक विभागाने विमानामधील कर्मचाऱ्यांना डायपर्स घालण्याचा सल्ला दिला आहे. करोनाचा सर्वाधिक संसर्ग असणाऱ्या ठिकाणी जाणाऱ्या चार्टर विमानांमधील केबिन क्रूला डिस्पोझेबल म्हणजेच वापरुन व्हिलेवाट लावता येणारे डायपर्स वापरण्याचा सल्ला हवाई वाहतूक विभागाने दिला आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून विमानामधील स्वच्छागृहांचा वापर टाळण्यासाठी हा उपाय सुचवण्यात आल्याचं ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासंदर्भात चीनमधील हवाई वाहतूक नियामक विभागाने ३८ पानांच्या सूचना आणि नियमांची यादीच जाहीर केली आहे. यापूर्वीही अशापद्धतीची यादी जाहीर करण्यात आली होती मात्र यंदाच्या यादीमध्ये अनेक नवीन गोष्टींचा समावेश आहे. चीनमधील नागरी वाहतूक नियामक विभागाने जारी केलेले हे नियम चार्टर विमानांमधील कर्मचाऱ्यांसाठी आहेत. प्रती १० लाख लोकसंख्येमागे ५०० हून अधिक जणांना संसर्ग झालेल्या देशांमध्ये जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या विमानांमधील कर्मचाऱ्यांना हे नियम पाळण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्यात.

नियमावलीमधील पर्नल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट विभागामध्ये डायपर्ससंदर्भात सूचना करण्यात आल्यात. डायपर्सबरोबरच विमानातील कर्मचाऱ्यांनी म्हणजेच केबिन क्रूमधील सदस्यांनी मास्क, दोन आवरणं असणारे रबरचे हॅण्ड ग्लोव्हज, गॉगल्स, विल्हेवाट लावता येणाऱ्या टोप्या, विल्हेवाट लावता येणारी कपडे, विल्हेवाट लावता येणारे बूट घालूनच प्रवास करावा आणि सेवा द्यावी असं म्हटलं आहे. विमानातील कर्मचाऱ्यांनी गॉगल्सही वापरावेत मात्र इतर गोष्टींप्रमाणे ते एकदा वापरुन फेकून देण्याची गरज नसल्याचे या नियमांमध्ये म्हटलं आहे.

याचबरोबर विमानाच्या केबिनचे आवश्यकतेनुसार, क्लीन एरिया, बफर झोन, प्रवाशांच्या बसण्याचा विभाग आणि क्वारंटाइनसाठीचा विभाग अशी विभागणी करण्याचा सल्लाही या नियमावलीत देण्यात आला आहे. विल्हेवाट लावता येणाऱ्या पडद्यांच्या मदतीने हे विभाग करावेत असंही यामध्ये म्हटलं आहे. आपत्कालीन क्वारंटाइन विभाग निर्माण करण्यासाठी विमानातील तीन रांगा रिकाम्या ठेवाव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. चीनमधून सध्या मर्यादित देशांमध्ये विमान वाहतूक सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र त्यामध्येही अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना वेळोवेळी नियमावली जाहीर करुन करण्यात येत आहेत.