घातक शस्त्रांची निर्मिती करण्यात आघाडीवर असलेल्या चीनने एकाच वेळी १० अण्वस्त्रे डागण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यानंतर भविष्यात चीन आणि अमेरिका यांच्यात संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने केलेल्या या क्षेपणास्त्र चाचणीला महत्त्व प्राप्त झालेले आहे.

‘द वॉशिंग्टन फ्री बिकन’च्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात चीनने एकाचवेळी दहा वेगवेगळ्या ठिकाणी मारा करण्याची क्षमता असलेल्या डीएफ-५सी या क्षेपणास्त्राची चाचणी केली. शांक्शी प्रांतातील ताईयुआन अवकाश केंद्रावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अशा प्रकारचे एमआयआरव्ही क्षेपणास्त्र दहा वेगवेगळ्या ठिकाणी डागता येते. यात अनेक अण्वस्त्रे ठेवण्याची क्षमता असते. तर पारंपरिक अण्वस्त्रे एका वेळी एकच लक्ष्यावर निशाणा साधू शकतात.

क्षेपणास्त्र चाचणीसंदर्भात अमेरिकेला माहिती आहे. तसेच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा या सर्व घडामोडींवर अगदी जवळून लक्ष ठेवून आहेत, असे या संदर्भातील वृत्तात दोन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वृत्तानुसार, डीएफ – ५ सी किंवा डॉन्गफेंग – ५ सी क्षेपणास्त्राची चाचणी चीनमधील शान्शी प्रांतातील ताईयुआन अवकाश केंद्रावरून करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र पश्चिम चीनच्या वाळवंटी परिसरात डागण्यात आले. प्रत्यक्ष चाचणीच्यावेळी अणवस्त्राऐवजी कमी क्षमतेच्या शस्त्रांचा वापर केला. डीएफ – ५ सी आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्र प्रणाली असून १९८० पासून चीनी लष्कर या क्षेपणास्त्राचा वापर करत आहे. काळानुरुप या क्षेपणास्त्रप्रणालीमध्ये बदल करुन अधिक अत्याधुनिक बनवण्यात आली आहे.

चीनकडे अण्वस्त्रांची संख्या अडीचशेच्या आसपास आहे, असे अमेरिकेचे निरीक्षण आहे. अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्राच्या चाचणीतून अण्वस्त्रांची संख्या भविष्यात आणखी वाढू शकते, असे संकेत मिळत आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, चीनने गेल्या वर्षी फेब्रुवारीपासूनच डीएफ-५ क्षेपणास्त्रांमध्ये अण्वस्त्रांचा वापर सुरू केलेला आहे. चीनकडून दूरवर मारा करण्याची क्षमता असलेल्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या करण्यात येणाऱ्या चाचण्यांमुळे क्षेत्रीय शांतता भंग होण्याची भीती अमेरिकेच्या सुरक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे, असे समजते.