पाकिस्तानने चीनच्या तिसऱ्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या लशीची परिणामकारकता कमी असतानाही पाकिस्तानने या लशीला परवानगी दिली असून करोना आटोक्यात आणण्यासाठी सरकारला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.

पाकिस्तान औषध नियंत्रक प्राधिकरणाने गुरुवारी म्हटले होते, की आम्ही या लशीला आपत्कालीन परवाना देत आहोत. सिनोव्हॅक बायोटेक कंपनीने ही लस तयार केलेली आहे. पाकिस्तानात परवानगी मिळालेली ही चीनची तिसरी लस आहे. करोनाव्हॅक असे या लशीचे नाव आहे. पाकिस्तानने या आधी सिनोफार्मच्या दोन मात्रांच्या तर कॅनसिनो बायोलॉजिकल्सच्या  कोविडेशिया या एक मात्रेच्या लशीला मान्यता दिली होती. ब्रिटनच्या अ‍ॅस्ट्राझेनेका व रशियाच्या स्पुटनिक ५ या लशींना पाकिस्तानी औषध नियंत्रकांनी परवानगी दिली होती. आतापर्यंत सिनोफार्मच्या लशी सरकारी रुग्णालयात देण्यात आल्या आहेत. तर खासगी क्षेत्रातील रुग्णालयात स्पुटनिक लशी दिल्या जात आहेत. करोनाव्हॅक या नव्याने मान्यता देण्यात आलेल्या लशीची परिणामकारकता कमी आहे पण सरकारने तरीही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. पाकिस्तानात २ फेब्रुवारीला लसीकरण सुरू करण्यात आले. १० लाख मात्रा देण्यात आल्या.