चीनचं भरकटलेलं स्पेस स्टेशन (तियांगोंग-1 ) सोमवारपर्यंत केव्हाही पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती आहे. संपर्क तुटलेलं हे स्पेस स्टेशन सोमवारी पहाटेपर्यंत केव्हाही पृथ्वीवर कोसळू शकतं. हे स्पेस स्टेशन कोसळल्याने मोठं नुकसान होण्याची शक्यता फेटाळण्यात आली असली तरी नेमकं हे स्पेस स्टेशन पृथ्वीच्या कोणत्या भागात कोसळेल याबाबत कोणतीही नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही.  त्यानंतर खगोलतज्ज्ञांमध्ये खळबळ उडाली आहे.

एका स्कूल बसच्या आकाराचं हे स्पेस स्टेशन असल्याची माहिती आहे. स्पेस स्टेशनच्या मार्गात भारताचा विशेषतः मुंबईचा काही भाग असल्याची शक्यताही काही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी हे स्पेस स्टेशन पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल असा अंदाज वर्तवण्यात आला असून, स्पेस स्टेशनच्या संभाव्य मार्गात मुंबईसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागराचा समावेश असल्याचंही तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.

खाली कोसळताना त्याचे लहान तुकडे होण्याची शक्यता आहे. या तुकड्यांमध्ये विषारी वायू असण्याची शक्यता असल्याने कोणीही त्याला हात लावू नये, असं आवाहन करण्यात येत आहे. याचे तुकडे 200 ते 300 किलोमीटर परिसरात पसरण्याची चिन्हं आहेत. या स्पेस स्टेशनची एजन्सी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन(सीएनएसए) ने मे २०१७ मध्येच २०१६ पासून स्पेस स्टेशनसोबतचा संपर्क तुटल्याचं सांगितलं होतं. हे चिनचं पहिलं स्पेस स्टेशन होतं. २०११ मध्ये हे लॉन्च केलं होतं, त्यावेळी स्वर्गातील राजमहल असं त्याला नाव देण्यात आलं होतं.