चीन आणि अमेरिकेमध्ये सुरु असलेली स्पर्धा आता अवकाशातही पाहायला मिळणार आहे. चीन मंगळावर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. चीनने आपल्या मिशन मंगळ मोहिमेला ‘तियानवेन 1’ नाव दिले आहे. ‘तियानवेन 1’ मिशनतंर्गत चीनने ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर मंगळावर उतरवण्याची योजना आखली आहे.

येत्या शनिवारी चीनच्या हैनान येथील तळावरुन लाँग मार्च ५ रॉकेट ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर घेऊन मंगळाच्या दिशेने झेपावेल. लाँग मार्च ५ चीनचे सर्वात शक्तीशाली रॉकेट आहे. या मोहिमेद्वारे मंगळावरील मातीचा अभ्यास करण्याची योजना आहे. चीनच्या या मिशन ‘तियानवेन 1’चे उड्डाण वातावरणावरही अवलंबून आहे.

चीन पाठोपाठ अमेरिकाही ३० जुलैला मंगळावर रोव्हर पाठवणार आहे. या आठवडयात सोमवारी संयुक्तअरब अमिरातीचे अवकाशयान मंगळाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले. अरब जगतातील कुठल्याही देशाने आतापर्यंत अशी आंतरग्रहीय मोहीम राबवली नव्हती. ‘अल अमल’ मंगळाच्या कक्षेत भ्रमण करेल.

अमेरिकेला अवकाशात टक्कर देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. १९९० पासून अमेरिकेने आतापर्यंत मंगळावर चार रोव्हर पाठवले आहेत. चीनचा हा पहिलाच प्रयत्न आहे. अमेरिका पर्सविअरन्स हा एसयूव्ही गाडीच्या आकाराचा रोव्हर मंगळावर पाठवणार आहे. या माध्यमातून अमेरिका मंगळावरील स्क्षूमजीवाचे अस्तित्व, खडक आणि मातीच्या नमुन्याचे परीक्षण करणार आहे.