भारताची कोंडी करण्यासाठी चीन-पाकिस्तान नेहमीच एकत्र येतात. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर तणाव असताना आता चीन पाकिस्तानला चार सशस्त्र ड्रोन विमाने देणार आहे. चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोअर आणि ग्वादर बंदरावरील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नौदालाच्या नवीन तळाच्या संरक्षणासाठी चीन पाकिस्तानला ही ड्रोन विमाने देणार आहे.

बलुचिस्तानच्या प्रांतात ग्वादर बंदराचा भाग असून चीनच्या बॉर्डर अँड रोड प्रकल्पामुळे या भागामध्ये मोठया प्रमाणावर अशांतता आहे. चीनने या बीआरआय प्रकल्पामध्ये तब्बल सहा कोटी डॉलर्सची गुंतवणू केली आहे. चीन पाकिस्तानला ग्राऊंड स्टेशनसह चार ड्रोन विमाने देणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे चारही ड्रोन्स हल्ला करण्यासाठी सक्षम आहेत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

चीनची पाकिस्तानसोबत मिळून ४८ GJ-2 ड्रोन्स बनवण्याची योजना आहे. आशिया आणि पश्चिम आशियातील अनेक देशांना चीनने विंग लूंग २ ड्रोन्सची विक्री आधीपासूनच सुरु केली आहे. टेहळणी बरोबरच हल्ला करण्यासही ही ड्रोन्स सक्षम आहेत. सशस्त्र ड्रोन्स विकणारा चीन एक मोठा निर्यातदार देश बनला आहे. स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार, कझाकस्तान, तुर्केमेनिस्तान, अल्जेरिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना चीनने २००८ पासून २०१८ पर्यंत १६३ यूएव्हीची विक्री केली आहे.

चिनी ड्रोन्समध्ये हवेतून जमिनीवर मारा करता येणारी १२ मिसाइल्स आहेत. लिबियामध्ये आपल्या सैन्याच्या मदतीसाठी यूएईकडून या चिनी ड्रोन्सचा वापर सुरु आहे. लिबियामध्ये चार चिनी ड्रोन्स पाडण्यात सुद्धा आली आहेत. चीन पाकिस्तानला लढाऊ ड्रोनचे तंत्रज्ञान देत असल्यामुळे आता भारतालाही अमेरिकेकडून प्रीडेटर-बी ड्रोन खरेदी करण्याच्या प्रक्रियेला वेग द्यावा लागणार आहे. फक्त टेहळणीच नाही तर लक्ष्य शोधून मिसाइल किंवा लेझर गाइडेट बॉम्बने ते उद्धवस्त करण्याची क्षमता प्रीडेटर-बी ड्रोनमध्ये आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेने याच ड्रोन्सच्या मदतीने अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.