यानाची छायाचित्रे प्रसिद्ध करून सामथ्र्य प्रदर्शन

चीनने आपल्या बहुप्रतीक्षित, महत्त्वाकांक्षी मंगळ यानाची जोरदार तयारी केली आहे. २०२० मध्ये सोडण्यात येणाऱ्या मंगळ यानाची छायाचित्रे चीनने प्रसिद्ध केली असून भारत, अमेरिका, रशिया यांच्याशी स्पर्धा करीत अवकाश सामथ्र्य वाढविण्यावर चीनचा भर असणार आहे.

जुलै किंवा ऑगस्ट २०२० मध्ये मंगळाच्या कक्षेत हे यान पाठविण्याची चीनची तयारी आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाचा तीन महिने अभ्यास करता येईल, अशी मंगळ यानाची रचना करण्यात आली आहे, असे चीनच्या मंगळ मोहिमेचे प्रमुख झांग रोंगकिओ यांनी सांगितले. चीनने पत्रकार परिषदेत मंगळ यानाची छायाचित्रे दाखवली. यानाच्या यंत्रात चार सौर पॅनलचा समावेश आहे.

चीनच्या आतापर्यंतच्या अंतराळ मोहिमेत मोठे यश मिळवले असले तरी मंगळ मोहिमेचा समावेश नसल्याने चीनला उणेपणाची जाणीव होत होती. याआधी चीनने चांद्रमोहीमही फत्ते केली होती. भारताने ७३ दशलक्ष डॉलर्स इतक्या कमी खर्चात मंगळ मोहीम फत्ते केल्यानंतर चीनच्या महत्त्वाकांक्षेला पुन्हा धुमारे फुटू लागले.