अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि हद्दपार करण्यात आलेले तिबेटी धर्मगुरू दलाई लामा हे गुरुवारी पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या एकत्र आल्यानंतर, दलाई लामांना पाहुणे म्हणून आमंत्रित करून तिबेटच्या त्रासदायक मुद्दय़ावर आपल्या अंतर्गत व्यवहारात कुणीही हस्तक्षेप करू नये, असा इशारा चीनने परराष्ट्रांना दिला आहे.
तिबेटशी संबंधित मुद्दय़ाच्या बहाण्याने इतर देशांनी चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणे आम्हाला पटण्यासारखे नाही. स्वत:चे राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दलाई लामा इतर देशांचा पाठिंबा मागत आहेत, परंतु ते यशस्वी होऊ शकणार नाहीत, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते होंग ली यांनी पत्रकारांना सांगितले.
दलाई लामा हे हद्दपार करण्यात आलेले राजकीय व्यक्ती असून, ते धर्माच्या नावाखाली चीनविरोधी फुटीर कारवायांमध्ये गुंतले असल्याचा आरोप ली यांनी केला.
ओबामा यांनी काल वॉशिंग्टनमधील एका प्रार्थनास्थळी दलाई लामा यांचे स्वागत करून, त्यांचे वर्णन ‘स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान यांची प्रेरणा’ असे केले. मात्र याबद्दल चीनच्या प्रसारमाध्यमांनी अमेरिकेवर टीका केली. तिबेटशी संबंधित मुद्दे हा चीनच्या हितसंबंधांचा व राष्ट्रीय भावनांचा विषय आहे. गेली अनेक दशके तिबेटला चीनपासून वेगळे करण्याचे प्रयत्न करणाऱ्या दलाई लामांना कुठल्याही देशाने पाहुणे म्हणून कधीच बोलावू नये, ही गोष्ट चीनने केव्हाच स्पष्ट केली आहे, असे ‘झिन्हुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.