29 October 2020

News Flash

चीनमध्ये ‘करोना’चे १,५०० बळी

हुबेई प्रांताला संसर्गाचा सर्वाधिक फटका

| February 15, 2020 03:33 am

हुबेई प्रांताला संसर्गाचा सर्वाधिक फटका

बीजिंग :  चीनमध्ये करोना विषाणूची लागण झाल्याने आतापर्यंत सुमारे दीड हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात हुबेई प्रांतात अलीकडे झालेल्या १२१ मृत्यूंचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या विषाणूची लागण झाल्याचे निश्चित झालेल्या चीनमधील रुग्णांची संख्या आता ६५ हजारांवर पोहोचली आहे.

करोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हुबेई प्रांतात गुरुवारी या विषाणूच्या बाधेमुळे ११६ जणांचे बळी गेले. याच दिवशी करोनाची लागण निश्चित झालेले आणखी ४८२३ रुग्ण नोंदले गेले, अशी माहिती या प्रांताच्या आरोग्य आयोगाने शुक्रवारी दिली.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशात करोनाचे नवे ५०९० रुग्ण आढळून आल्याने या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ६४ हजार ८९४ झाली आहे.

गुरुवारी देशभरात करोनाचे १२१ रुग्ण दगावले, तसेच करोनाची लागण निश्चित झाल्याचे ५०९० रुग्ण नोंदविण्यात आले. गुरुवारच्या एकूण १२१ मृत्यूंपैकी ११६ हुबेई प्रांतात, दोन हीलोंगजिंग प्रांतात आणि प्रत्येकी एक अन्हुई, हुनान आणि चॉन्गक्विंग प्रांतात झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये करोनाच्या रुग्णांची नोंदणी करण्याच्या पद्धतीत बदल केल्याने रुग्णसंख्या एकदम २५४ इतकी वाढल्याचे दिसत असले, तरी यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला असे मानण्याचे कारण नाही, असा निर्वाळा संघटनेने दिला.

मास्कची भेट हेच प्रेमाचे प्रतीक!

करोनाच्या दहशतीची छाया हाँगकाँगमध्ये पसरली असली तरी, प्रेमदिन म्हणजे व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने करोनाबाबतचे विनोदही चर्चेत आले आहेत. विषाणूच्या दहशतीमुळे व्हॅलेन्टाईनचा बाजार तसा थंड आहे. प्रेमच व्यक्त करायचे असेल तर आपल्या आवडत्या माणसाला फुलांचा गुच्छ देण्याऐवजी मास्कचा संच भेट द्या, असे संदेश फिरत आहेत.

लुफ्थान्साची हवाई सेवा स्थगित

चीनमध्ये करोनाची साथ उद्भवल्याने जर्मनीतील बडी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या ‘लुफ्थान्सा’ने चीनमध्ये जाणारी आपली उड्म्डाणे येत्या २८ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बिजिंग आणि शांघायला जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे.

स्पाईस जेटची दिल्ली हाँगकाँग सेवा रद्द

स्पाईस जेटने आपली दिल्ली ते हाँगकाँग हवाई सेवा १६ ते २९ फेब्रुवारी या कालावधील स्थगित ठेवण्याची घोषणा केली आहे. इंडिगो आणि एअर इंडियाने याआधीच त्यांची भारतातून चीनला जाणारी उड्डाणे स्थगित केली आहेत.

तिबेटकडे पर्यटकांची पाठ

हिमालयाच्या कुशीतील तिबेटमध्ये पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. चीनमध्ये करोना विषाणूची साथ पसरल्याने तिबेटमधील निंगची या प्रसिद्ध पर्यटनस्थळाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. तिबेटच्या भौगोलिक स्थानामुळे या भागात हवेत ऑक्सिजनची घनता तुलनेत कमी आहे. त्याचप्रमाणे या भागात वैद्यकीय सुविधा अत्यंत मर्यादित असल्याने स्थानिक प्रशासनाने आधीच दक्षतेची पावले उचलली आहेत.

चीनने अमेरिकेचा आरोप फेटाळला

चीनमधील करोनाच्या साथीबाबत चीन सरकारकडून पारदर्शकपणे वस्तुस्थिती मांडली जात नसल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. चीनने हा आरोप फेटाळून लावला आहे. करोनाच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सोबतीने काम करीत आहोत आणि हे आमच्या खुलेपणाचे, जबाबदारीच्या जाणिवेचे निदर्शक आहे, असे चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जेंग शुआंग यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय पथक चीनच्या मार्गावर

जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य आणीबाणीविषयक कार्यक्रमाचे प्रमुख मायकेल रायन यांनी जिनिव्हा येथील पत्रकार परिषदेत सांगितले की, या आठवडय़ाच्या अखेरीस जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय पथक चीनमध्ये दाखल होणे अपेक्षित आहे. जागतिक आरोग्य संघटनेची १५ सदस्यीय अग्रिम तुकडी सोमवारीच चीनमध्ये दाखल झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 3:33 am

Web Title: china virus death toll nears 1500 zws 70
Next Stories
1 ‘सीएए’विरोधी वक्तव्य: डॉ. काफील खान यांच्याविरुद्ध ‘रासुका’न्वये कारवाई
2 जम्मू-काश्मीरमधील निर्बंध मागे घ्या ; युरोपीय महासंघाची मागणी
3 राज्यसभेवर भाजपतर्फे आठवले, उदयनराजे?
Just Now!
X