पाकिस्तानला खात्री
अणुपुरवठादार गटामध्ये (एनएसजी) सहभागी होण्याचे भारताचे प्रयत्न असून त्यासाठी अमेरिकेचा भारताला पाठिंबा असला तरी चीन भारताचा या गटात प्रवेश होऊ देणार नाही, असा विश्वास पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
स्ट्रॅटजिक व्हिजन इन्स्टिटय़ूट (एसव्हीआय) आणि कॉनरड अडेनेऊर स्टिफटंग यांनी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय अणुकार्यक्रमावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात सहभागी होताना पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रसंघातील माजी कायम प्रतिनिधी झमीर अक्रम यांनी वरील विश्वास व्यक्त केला.
अणुपुरवठादार गटांत भारताचा प्रवेश होण्याची शक्यता जवळपास नसल्याचे द डॉनने अक्रम यांचा हवाला देऊन म्हटले आहे. अणुपुरवठादार गटात ४८ देश असून त्यामध्ये भारताचा प्रवेश चीन होऊ देणार नाही. कारण तसे झाल्यास चीन आणि पाकिस्तान यांच्यातील अणुसहकार्यात बाधा निर्माण होईल, असा दावा अक्रम यांनी केला आहे.
भारत आणि पाकिस्तानला एकाच वेळी सदस्यत्व मिळेल यासाठी चीन वचनबद्ध आहे. भारतच्या प्रवेशाबाबत दुहेरी नीतीचा अवलंब केला जात असल्याने चीनसह अन्य काही देशही नाराज झाले आहेत आणि त्यांनी निकषांवर आधारित दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले आहे, असेही अक्रम म्हणाले.
अणुपुरवठादार गटामध्ये भारताला सदस्यत्व मिळण्याची संधी फेटाळण्यात येण्याची ही एका महिन्यातील दुसरी वेळ आहे. गेल्या महिन्यांत राष्ट्रीय कमांड प्राधिकरणाचे सल्लागार लेफ्ट. जन. (निवृत्त) खलिद किडवाई यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, अणुपुरवठादार गटामध्ये आमचे मित्र आहेत आणि ते भारताचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीत.