चीनच्या झिजियांग प्रांताची राजधानी असलेल्या उरुक्मी येथील बाजारपेठेत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या तब्बल १२ स्फोटांमध्ये किमान ३१ जण ठार झाले, तर ९० हून अधिक जण जखमी झाले. चीनमधील उयघुर मुस्लिम आणि फुटीरतावाद्यांकडे या हल्लाप्रकरणी संशयाने पाहिले जात आहे. दरम्यान, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही, तर त्यांच्या विरोधातील मोहीम तीव्र करेल, असे आश्वासन पाकिस्तानने चीनला दिले आहे.
अत्यंत गजबजलेल्या उरुक्मी येथील बाजारात सकाळी पावणे आठच्या सुमारास दोन गाडय़ा भरधाव वेगाने शिरल्या आणि चालकाशेजारी बसलेल्या अज्ञात इसमांनी बॉम्ब फेकण्यास सुरुवात केली. तर एका वाहनाचा भर बाजारपेठेत स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता सर्वाधिक होती. ज्यामध्ये किमान ३१ जण ठार झाले, अशी माहिती चीनच्या झिनुआ या सरकारी वृत्तसंस्थेतर्फे देण्यात आली.
हल्ल्याची तीव्रता इतकी होती, की अनेक जखमी व्यक्ती आणि मृतांची शरीरे बाजारपेठेत इतस्तत: विखुरली. जखमींना तातडीने सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विविध सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये रस्त्यावर विखुरलेले मृतदेह दिसत असून, आसमंतात सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे.