पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला, अशी माहिती लष्कराने सोमवारी दिली.

पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिण काठावर २९ ते ३० ऑगस्ट दरम्यान रात्री चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने चिथावणीखोर लष्करी कारवाया करून ‘जैसे थे’ परिस्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी मोडून काढला, असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले.

लष्करी आणि राजनैतिक पातळीवर दोन्ही देशांमध्ये झालेल्या मतैक्याचे उल्लंघन चिनी लष्कराने केले. त्यामागे ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा हेतू होता, असेही आनंद यांनी नमूद केले.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिक पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिण काठाकडे कूच करीत होते. त्यांचा हेतू लक्षात येताच भारतीय लष्कराने त्या भागात जवानांच्या तुकडय़ा तैनात केल्या. त्या भागात काही काळ तणाव निर्माण झाला, परंतु दोन्ही देशांच्या लष्करात कोणतीही झटापट झाली नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, भारतीय लष्कर शांततेसाठी वचनबद्ध आहे, भारताच्या प्रादेशिक एकात्मतेचा भंग होऊ देणार नाही, असे लष्कराचे प्रवक्त आनंद यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी १५ जूनला गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हिंसाचारात २० भारतीय जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर चीनने पुन्हा आगळीक केली आहे.  भारत-चीन यांच्यात लष्करी आणि राजनैतिक पातळीवर अनेकदा चर्चा झाली, परंतु पेचप्रसंगाची कोंडी फुटू शकली नाही. दोन्ही देशांनी ६ जुलैला सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू केली, त्याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात चर्चा झाली होती. ६ जुलैला सुरू झालेली शांतता चर्चा फार पुढे गेली नाही. गलवान खोऱ्यातून पीपल्स लिबरेशन आर्मीने माघार घेतली, इतरही काही ठिकाणी त्यांनी सैन्य माघारी घेतले; पण पँगॉग त्सो आणि देपसांगसह आणखी दोन ठिकाणाहून चिनी सैन्याने माघार घेतलेली नाही.

कोअर कमांडर पातळीवर चर्चेच्या पाच फेऱ्या होऊनही सैन्य माघारीबाबत फारशी प्रगती झालेली नाही. पूर्व लडाखमध्ये पूर्वी होती तशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. ५ मे रोजी दोन्ही देशांच्या लष्करात पँगाँग त्सो सरोवर भागात हिंसक चकमकी झाल्या. त्यानंतर ९ मे रोजी उत्तर सिक्कीममध्ये हिंसक चकमक झाली. भारत व चीन यांच्यातील सीमा रेषा ३४८८ कि.मी लांबीची असून चकमकीपूर्वी दोन्ही देशांनी सीमाप्रश्न सोडवण्यासाठी तोडगा काढण्याच्या आवश्यकते भर दिला होता. लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आधीच लष्कराच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कमांडर्सना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

काय घडले?

चिनी लष्करी तुकडय़ा पूर्व लडाखमधील पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडे कूच करत होत्या. चिथावणीखोर लष्करी कारवाया करून पुन्हा घुसखोरी करण्याचा चीनचा प्रयत्न होता. परंतु तो भारतीय जवानांनी हाणून पाडला. चीनने यावेळी घुसखोरीसाठी नवे ठिकाण निवडले होते.