आपल्या देशाचा अविभाज्य भाग असलेल्या प्रत्येक इंचाचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे स्पष्ट करीत चीनने शनिवारी आपल्या शेजारी राष्ट्रांना सूचक इशारा दिला आहे. बेटांच्या मालकी हक्कावरून जपानबरोबरच्या वादाच्या पाश्र्वभूमीवर चीनने आपली आक्रमक भूमिका जाहीर केली आहे.
जे आमचे नाही, त्यावर आम्ही दावा सांगणार नाही. मात्र आमच्या प्रदेशावर कोणी हक्क सांगत असेल तर त्याचे रक्षण कोणत्याही परिस्थितीत करू, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. राष्ट्रीय पीपल्स कॉंग्रेसच्या वार्षिक परिषदेदरम्यान वांग पत्रकारांशी बोलत होते.
या पत्रकार परिषदेत वांग यांनी भारताचा थेट उल्लेख केला नाही. मात्र दक्षिण चिनी समुद्रातील बेटांच्या मालकी हक्कावरून जपानशी असलेल्या मतभेदांच्या पाश्र्वभूमीवर वांग यांनी शेजारी राष्ट्रांनी कोणतीही आगळीक केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असे सांगितले.
चिनी सैन्याने अनेकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच अरुणाचल प्रदेशमधील काही भागावरही चीनने दावा केला आहे. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत. तर दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रातील काही बेटांवर चीन सांगत असलेल्या मालकी हक्काबाबत फिलिपाइन्स, व्हिएतनाम, मलेशिया,ब्रुनेई आदी देशांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे.