चीनमधील ‘हम दो हमारा एक’ या धोरणाला काही वर्षांपूर्वी शिथिल करण्यात आलं. मात्र त्यानंतरही चीनमधील जन्मदर वाढत नसल्याने आता जन्मदरासंदर्भातील नियमांमध्ये आणखीन सूट देण्याचा विचार चीनमधील प्रशासनकाडून केला जात आहे. चीनमध्ये मागील अनेक दशकांपासून आपल्या वाढत्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी किमान साधनांचा वापर देशातील जनतेकडून केला जावा या उद्देशाने जन्मदरासंदर्भातील कठोर कायदे केले होते. मात्र आता जन्मदर इतका कमी झाला आहे की या कायद्यामध्ये सूट दिल्यानंतरी जन्मदरात वाढ झालेली नाही. त्यामुळेच आता आर्थिक विकास आणि सामाजिक स्थैर्य या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्याचे लक्षात घेत या कायद्यामध्ये अधिक सूट देण्याचा विचार चीनमध्ये सुरुय.
चीनमधीर राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थापनाने जारी केलेल्या एका वक्तव्यामध्ये जन्मदर वाढण्यासाठी सध्याच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या नवीन धोरणानुसार सर्वात आधी देशाच्या पूर्वेकडील औद्योगिक क्षेत्रातील भागांवर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे असं चीन सरकारने स्पष्ट केलं आहे. ईशान्य चीनमधील अनेक प्रांत हे औद्योगिक पट्ट्यात येतात. या ठिकाणी जन्मदर कमालीचा घटला आहे. याच प्रांतामध्ये नवीन नियम लागू करण्याचा चीनचा विचार आहे. चीनमध्ये दर काही वर्षांनी ठराविक भागांमध्ये जन्मदारसंदर्भातील नियमांमध्ये बदल करुन चाचपणी केली जाते. धोरणांमध्ये टप्प्याटप्प्यांनुसार बदल करत ती धोरणं यशस्वी ठरल्यास देशभरात लागू करण्यासाठी चीन ओळखला जातो. अशीच चाचपणी सध्या जन्मदरासंदर्भातील कायद्याबद्दल सुरु आहे.
जगभरातील आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांपैकी चीनमधील लोकसंख्येचं वय झपाट्याने वाढत आहे. मागील अनेक दशकांपासून चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात आलेले कठोर कायदे यासाठी कारणीभूत आहेत. मागील काही वर्षांमध्ये प्रायोगित तत्वावर हे कायदे शिथिल करण्यात आले असले तरी जन्मदरामध्ये सातत्याने घसरण होत आहे. २०१९ मध्ये तर जन्मदर हा १९४९ च्या जन्मदराइतका पडला होता. २०२० मध्येही चीनमधील जन्मदरात घसरण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. २०२० मध्ये जन्मदर १५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. २०२० मधील सविस्तर अहवाल एप्रिल महिन्यामध्ये प्रकाशित केला जणार आहे.
चीनमधील लिओनिंग, जिलिन आणि हेइलोंगजियांग या प्रांतामध्ये २०१९ साली सलग सातव्या वर्षी जन्मदरात घसरण झाल्याचे पहायला मिळालं. चीनमधील राष्ट्रीय सांख्यिक ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये प्रती हजार व्यक्तींमध्ये जन्मदर १०.४८ इतका होता. हा १९४९ नंतरचा सर्वात कमी जन्मदर आहे. २०१९ साली चीनमध्ये एक कोटी ४६ लाख ५० हजार बालकांचा जन्म झाला. हा आकडा मागील वर्षातील नवजात बालकांच्या आकडेवारीपेक्षा ५ लाख ८० हजारने कमी आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 9:42 am