करोनाचा सर्वप्रथम उद्रेक झालेलं चीनमधील वुहान शहर पुन्हा पूर्वपदावर येऊ लागलं आहे. वुहानमधून करोना नष्ट झाला असून, आता वुहानमधील शाळा आणि बालवाडीचे वर्गही मंगळवारपासून सुरू होणार आहे. वुहानमधील स्थानिक प्रशासनाच्या हवाल्यानं रॉयटर्सनं हे वृत्त दिलं आहे.

प्रचंड वेगानं फोफावणाऱ्या या करोना व्हायरस जगाची झोप उडवली आहे. जगातील अनेक देशांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं असून, अजूनही करोनाचा प्रसार रोखण्यात यश आलेलं नाही. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे चीनमधील ज्या वुहान शहरात करोनाचा सर्वप्रथम उद्रेक झाला होता. तेथून करोना हद्दपार झाला आहे.

वुहानमधील स्थानिक प्रशासनानं शहरातील शाळा मंगळवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचा प्रचंड झळ बसलेलं वुहान आता पूर्वपदावर येत असून, सोमवारपासून वुहान विद्यापीठ सुरू होणार आहे. तर मंगळवारपासून सर्व शाळा आणि अंगणवाड्याही सुरू करण्यात येणार आहे. वुहानमधील २ हजार ८४२ शैक्षणिक संस्थांचे दरवाजे मंगळवारी खुले होणार असून, १.४ मिलियन विद्यार्थी शाळेत परतणार आहेत.

जगाला वेठीस धरणाऱ्या करोना महामारीचा सर्वात प्रथम उद्रेक झाला तो चीनमध्ये. चीनच्या वुहान शहरात करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण सर्वप्रथम आढळून आले. त्यानंतर हळूहळू हा व्हायरस हवाई प्रवासी वाहतुकीमुळे जगभरात पोहोचला.

भारतातील स्थिती काय?

भारतात अजूनही करोना प्रसार नियंत्रणात आलेला नाही. चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्यानं देशात करोना पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सरकारनं अनलॉक ३ जाहीर करताना शैक्षणिक संस्था बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अनलॉक ३ चा टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर अनलॉक ४ साठीची मार्गदर्शन सूचना जारी करण्यात येतील. त्यात शाळा सुरू करण्याबद्दल सरकारकडून मोकळीक दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यांनी निर्णय घ्यावा, अशी सूचना केंद्र सरकार करू शकते.