सीओव्हीआयडी १९ विषाणू अमेरिकी लष्करानेच चीनमध्ये आणल्याचा आरोप चीनमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला होता, त्याची दखल घेत अमेरिकेने चीनच्या राजदूतास बोलावून घेऊन समज दिली.

अमेरिकेचे आशियाविषयक राजनैतिक अधिकारी डेव्हिड स्टीलवेल यांनी चीनचे राजदूत कुई टियानकाई यांना कठोर संदेश असलेला खलिता हातात दिला. चीनचे परराष्ट्र अधिकारी झाओ लिजियान यांनी अमेरिकी लष्करानेच करोना विषाणू वुहानमध्ये आणल्याचा आरोप केला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले, की चीनमुळेच ही साथ सुरू झाली व त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत. जगाला सत्य माहिती सांगण्यास चीन तयार नाही. चीनने कटकारस्थानांची भाकिते करणे धोकादायक असून आमचे सरकार हे सहन करणार नाही. आमची ही भूमिका चीन व जगातील लोकांच्या भल्यासाठीच आहे.

झाओ यांनी मँडरिन व इंग्रजी  भाषेतून केलेल्या ट्विट संदेशात असे म्हटले होते, की रुग्ण शून्य (पहिला रुग्ण) हा अमेरिकेतून वुहानमध्ये आला. अमेरिकी लष्करानेच हा विषाणू वुहानमध्ये आणला. अमेरिकेने पारदर्शकता दाखवून माहिती जाहीर करावी. आम्हाला स्पष्टीकरण हवे आहे.

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर करोनाला दिलेल्या ढिसाळ प्रतिसादाबाबत टीका होत असताना असे म्हटले होते, की या विषाणूचे मूळ परदेशात आहे.अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी या विषाणूचा उल्लेख ‘वुहान विषाणू’ असा केला होता.