सध्या युनायटेड किंगडममधील न्यायालयात चिनी बँकांच्या सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान रिलायन्स समुहाचे प्रमुख (एडीएजी) यांनी आपण एक साधारण आयुष्य जगत असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपल्याकडे असलेले दागिने विकून आपण आपल्या वकिलांची फी भरत असल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं.

“यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीदरम्यान आपण ९.९ कोटी रूपयांच्या सोन्याचे दागिने विकले. आता आपल्याकडे कोणतंही महागडं सामान शिल्लक नाही,” असंही अनिल अंबानी यांनी न्यायालयाला सांगितलं. दरम्यान, यावेळी न्यायालयानं त्यांना त्यांच्याकडे असलेल्या लग्झरी गाड्यांबद्दलही सवाल केला. “या सर्व माध्यमांमधून अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्याकडे कधीही रोल्स रॉयस नव्हती. मी सध्या केवळ एकाच गाडीचा वापर करत आहे,” असंही अंबानी म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
संपत्तीची माहिती देण्याचे आदेश

२२ मे २०२० रोजी यूके उच्च न्यायालयानं अनिल अंबानींना १२ जून २०२० पर्यंत चीनच्या तीन बँकांचे ७१,६९,१७,६८१ डॉलर्स (जवळपास ५ हजार २८१ कोटी रूपये) कर्जाची रक्कम आणि ५० हजार पौंड्स ( जवळपास ७ कोटी रूपये) कायदेशीर प्रक्रियेच्या खर्चाच्या रकमेपोटी भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १५ जून रोजी इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाच्या नेतृत्वाखाली चिनी बँकांनी अनिल अंबानी यांच्या संपत्तीची माहिती देण्याची मागणी केली.

२९ जून रोजी मास्टर डेविसन यांनी अंबानी यांना अॅफिडेव्हिटच्या आधारे जगभरातील त्या संपत्तींची माहिती देण्यास सांगितली ज्यांची किंमत १ लाख डॉलर्सपेक्षा अधिक आहे. तसंच ज्या संपत्तींमध्ये ते भागीदार आहेत किंवा पूर्णत: ती संपत्ती त्यांचीच आहे याची माहिती देण्याचे आदेश अनिल अंबानींना देण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर दिलेल्या अॅफिडेव्हिटमधघ्ये अंबानी यांनी सांगितलं की त्यानी रिलायन्स इनोव्हेंचरला ५ अब्ज रूपयांचं कर्ज दिलं आहे. “रिलायन्स इनोव्हेंचर्समध्ये १.२० कोटी इव्किची शेअर्सची कोणतीही किंमत नाही. कौटुंबीक ट्रस्टसमेत जगभरातील कोणत्याही ट्रस्टमध्ये त्यांचं कोणतंही आर्थिक हित नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान यावेळी चिनी बँकांची बाजू मांडणारे वकिल बंकिम थांकी क्यूसी यांनी अनिल अंबानी न्यायालयासमोर योग्य माहिती देत नसल्याचं म्हटलं. तसंच त्यांनी यावेळी त्यांच्या ट्रस्टबरोबर आर्थिक हित आहे का? असा सवालही केला. तसंच ३१ डिसेंबर २०१९ रोजी अनिल अंबानी यांच्या खात्यात ४०.२ लाख रूपये होते. परंतु १ जानेवारी २०२० रोजी एका रात्रीत त्यांच्या खात्यात २०.८ लाख रूपयांची रक्कम शिल्लक राहिल्याची माहितीही न्यायालयाला मिळाल्याचं वकिलांनी सांगितलं. तसंच यावेळी त्यांनी टीना अंबानी आणि अनिल अंबानी यांच्या कलेक्शनची माहिती का दिली जात नाही असाही सवाल करण्यात आला.

“तो माझ्या पत्नीचा संग्रह होता. मी त्यांचा पती आहे म्हणूनच त्यांनी याबाबत माहिती देण्यासाठी माझी परवानगी मागितली होती. २०१९-२० मध्ये रिलायन्स इन्फ्रान्स्ट्रक्चरकडून कोणतीही प्रोफेशनल फी आकारली नाही. तसंच सध्या जशी परिस्थिती आहे त्यानुसार यावर्षीही काही मिळणार नाही,” असं अंबानी यांनी स्पष्ट केलं.

पत्नी आणि कुटुंबीयांकडून आपला खर्च

“आपला खर्च फार कमी आहे आणि आपली पत्नी आणि कुटुंबीय आपला खर्च करतात. सध्या उत्पन्नाचे कोणते अन्य स्त्रोतही नाहीत. घरातील सोन्याचे दागिने विकून मी कायदेशीर प्रक्रियेचा खर्च भागवत आहे. माझी अन्य संपत्तींची विक्री करण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल,” असंही अंबानी म्हणाले. तसंच यावेळी त्यांना खासगी हेलिकॉप्टरबाबतही सवाल करण्यात आला. आपण केवळ वैयक्तिकरित्या वापर केल्यास त्याचे पैसे देतो. तसंच लॉकडाउनमध्ये त्याचा आपण वापर केला नसल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं.

खरेदीबद्दलही प्रश्न

न्यायालयात त्यांना लंडन, कॅलिफोर्निया, बीजिंग आणि अन्य ठिकाणी खरेदी करताना वापरलेल्या क्रेडिट कार्डाच्या बिलाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. “यापैकी अधिक खरेदी आपल्या आईनं केली होती. घरातील ८ महिन्यांचं वीजबिल ६०.६ लाख रूपये आलं,” असंही न्यायालयाला सांगितलं. तसंच कंपनी महागड्या दरानं वीज देत असल्याचं सांगितलं. अनिल अंबानी कायम सामान्य जिवन जगण्यावरच विश्वास ठेवतात. परंतु अनेकदा त्यांच्याबद्दल अफवा पसरत असल्याचं त्यांच्या प्रवक्त्यांनी सुनावणीनंतर सांगितलं.