चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अब्जाधीश, चीनमधील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांनी मागील काही महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे जॅक मा हे बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जॅक मा यांच्यासंदर्भातील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

नक्की वाचा >> धक्कादायक… करोनाच्या उत्पत्तीची माहिती जगासमोर आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना चीन देतोय त्रास

त्या कार्यक्रमातील अनुपस्थिती खटकणारी

आलिबाबाचे संस्थापक असणारे जॅक मा हे त्यांच्या स्वत:च्या टॅलेंट शोच्या म्हणजेच आफ्रिकाज् बिझनेस हिरोज या कार्यक्रमाच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जॅक मा हे या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीसाठी प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र अगदी शेवट्या क्षणी जॅक यांच्या जागी अलिबाबा कंपनीच्या अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या कर्यक्रमाला उपस्थिती लावली. हा सर्व प्रकार नोव्हेंबर महिन्यामध्ये घडल्याचे युनायटेड किंग्डममधील टेलीग्राफने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीचे संस्थापक असणाऱ्या जॅक मा यांचा फोटोही वेबसाईटवरुन काढून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आलं आहे. नोव्हेंबर महिन्यामधील या कर्यक्रमाला जॅक मा हे अनुपस्थित राहिल्यासंदर्भात नंतर त्यांच्या अधिकृत प्रवक्त्यांनी सारवासारव करणारी उत्तरं दिली. जॅक मा यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये अडचणी येत असल्याने ते या शोच्या अंतिम फेरीसाठी उपस्थित राहू शकले नाही असं सांगण्यात आल्याचं वृत्त फायनॅनशियल टाइम्सने दिलं होतं.

नक्की वाचा >> भारतासाठी धोक्याचा इशारा, चीन पोहचला अरुणाचलच्या सीमेजवळ; तिबेटला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण

खरं कारण ठरलं ते वक्तव्य?

जॅक मा यांच्या अ‍ॅण्ट समुहासंदर्भात (एएनटी ग्रुप) ऑक्टोबर महिन्यापासून एक नवीन वाद सुरु झाल्याचे वृत्त आहे. जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर रोजी चीनमधील सरकारी धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती. शांघायमधील आपल्या एका भाषणामध्ये जॅक मा यांनी देशात संशोधनाला वाव मिळत नाही असं मत व्यक्त करण्याबरोबरच जागतिक बँकींगसंदर्भात बोलताना चीन अजूनही जुन्या लोकांचा क्लब असल्यासारखे वाटते असं मत व्यक्त केलं होतं. “आजची आर्थिक व्यवस्था ही औद्योगिकरणामुळे निर्माण झालेली आहे. आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी नवीन आर्थिक व्यवस्था निर्माण ेकली पाहिजे. आपण आपली सध्याची आर्थिक व्यवस्था बदलण्याची आवश्यकता आहे,” असं परखड मत जॅक मा यांनी व्यक्त केलं होतं. जॅक मा यांनी शेवटचं ट्विटही १० ऑक्टोबर २०१९ रोजी केलं आहे.

…अन् आयपीओची परवानगी नाकारली

जॅक मा यांच्या या वक्तव्यानंतर एएनटीच्या आयपीओला चीनमधील सरकारी यंत्रणांनी दिलेली परवानगी नाकारण्यात आली. या आयपीओची किंमत ३७ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती. शांघाय स्टॉक एक्सचेंजने एएनटी समुहासंदर्भात काही तक्रारी समोर आल्या असून आर्थिक तंत्रज्ञाना नियमकामध्ये बदल करण्यासंदर्भातील तक्रार समोर आल्याचं सांगत कंपनीच्या आयपीओला विरोध केला होता.

कोणीही मोठं होऊ नये म्हणून…

मात्र अमेरिकन गुंतवणूकदार मार्क मोबीयस यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार वित्तीय संस्था मोठ्या होण्यापासून रोखण्यासाठी जॅक मा यांच्या एएनटी समुहाची अडवणूक करण्यात आली. “मला वाटतं चीनमधील सरकारला या कंपन्यांवर देखरेख ठेवण्याची गरज भविष्यात निर्माण होईल असं वाटलं असावं. त्यामुळेच या कंपन्या मोठ्या होऊ नयेत म्हणून हे प्रयत्न करण्यात आले. एखादी विशिष्ट कंपनी एखाद्या क्षेत्रात मत्तेदारी निर्माण करण्याएवढी मोठी व्हावी असं चिनी सरकारचं धोरण दिसत नाही. अशा कंपन्यांना विरोध करण्यासाठीच या प्रकरणात चीन सरकारने लक्ष घातलं. खास करुन आर्थिक क्षेत्रातील कंपन्या मोठ्या होणं चीन सरकारला मान्य नसल्याचं दिसत आहे,” असं मोबीयस यांनी सीएनबीसीशी बोलताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> आता धोका Disease X चा; इबोला शोधणाऱ्या डॉक्टरने दिला करोनापेक्षाही भयंकर विषाणूच्या संसर्गाचा इशारा

जगभरात केलीय मदत

चीन सरकारच्या हाती असणाऱ्या यंत्रणांनी अलिबाबा कंपनीविरोधात मत्तेदारी स्थापन करण्यासंदर्भातील चौकशी सुरु केली. डिसेंबर महिन्यामध्ये ही चौकशी सुरु झाली आणि त्यानंतर एएनटी कंपनीला त्यांची रचना बदलण्यासंदर्भातील सूचना सरकारी यंत्रणांनी केल्या. जॅक मा यांनी मध्यंतरी करोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, युरोप आणि जागतिक आरोग्य संघटनेला कोट्यावधी फेस मास्क मदत म्हणून पाठवले होते. जॅक मा हे त्यांच्या समाजसेवेसाठीही ओळखले जातात. जॅक मा फाऊण्डेशन हे शिक्षण, व्यवसाय, महिला नेतृत्व आणि पर्यावरण या क्षेत्रामध्ये काम करतं. फोर्ब्सच्या अहवालानुसार ३०० मिलियन अमेरिकन डॉलर्सहून अधिक मदत करण्याचं उद्देश जॅक मा यांच्या सेवाभावी संस्थेनं समोर ठेवलं आहे.