14 August 2020

News Flash

चीन नाही सुधारणार, पँगाँगमध्ये हेलिपॅडची उभारणी, दक्षिण किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव

चीनने बांधकाम बंद करावे, भारताने दिला इशारा

पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये प्रचंड मोठा तणाव आहे. मागच्या काही दिवसांपासून हा संघर्ष अधिक वाढू नये, यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पण प्रत्यक्षात परिस्थिती बदलेली नाही. सध्यातरी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्समध्ये कुठलीही चर्चा होणार नाही तसेच चीनने पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राच्या भागात आपली स्थिती अधिक बळकट करण्यासाठी मोठया प्रमाणावर सैन्याची जमवाजमव सुरु केली आहे.

फिंगर फोरवर चीनने हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅडची बांधणी सुरु केली आहे. पँगाँग टीएसओ दक्षिण किनाऱ्यावर अचानक चिनी सैन्य तुकडयांची संख्या देखील वाढली आहे. चीन फिंगर फोरवर दावा सांगत आहे. त्यादृष्टीने त्यांनी तिथे सुरु केलेली तयारी निश्चित धोक्याची घंटा आहे. कारण त्यांनी भारतीय सैन्याचा फिंगर आठ पर्यंत गस्त घालण्याचा मार्ग रोखून धरला आहे. यापू्र्वी एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर आठपर्यंत गस्त घालायचे.

“पँगाँग टीएसओ तलावाच्या उत्तरेला चिनी सैन्याने जमवाजमव सुरु केलीय हे बरोबर आहे. मागच्या आठ आठवडयात त्यांनी फिंगर क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामे केली आहेत, त्यात हेलिपॅड आणखी एक नवीन काम आहे” एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला ही माहिती दिली आहे.

‘आम्ही माघार घेणार नाही तसेच परिस्थिती जैसे थे तशी कायम करणार नाही हाच चीनच्या कृतीमधून अर्थ निघतो’ असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच ‘पँगाँग टीएसओ क्षेत्राबद्दल चर्चा करण्यात त्यांना रस नाहीय’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.

चीनने बांधकाम बंद करावे नाहीतर…भारताचा इशारा
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती सुधारण्यासाठी चीनने वेळोवेळी घुसखोरी करून तेथे नवीन पायाभूत सुविधा उभारण्याचे बंद करावे, असा इशारा भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी दिला आहे.

सैन्य माघारी घेऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर माघारी जाण्याच्या जबाबदारीचे भान चीनने ठेवावे असे सांगून ते म्हणाले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी करून नवीन बांधकामे करण्याचे चीनने आता बंद करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन सीमेवरील वादावर जे भाषण केले होते त्याच्या एकदम विरोधी बाबी भारताच्या राजदूतांनी मांडल्या. मिस्री यांनी सांगितले की, भारतीय सैन्याच्या नेहमीच्या गस्तीच्या कामात चीनची सैन्यदले नेहमी अडथळे आणतात. गलवान भागातील प्रदेशावर चीनने केलेला दावा समर्थनीय नसल्याचे सांगून त्यांनी म्हटले आहे की, भारत सरकारने वेळोवेळी हे सांगूनही फरक पडत नसल्याने परिस्थिती चिघळत असून असे अतिरंजित दावे करून परिस्थिती सुधारण्यास मदत होणार नाही.

गलवान खोऱ्यातही संघर्ष झालेल्या ठिकाणी केले बांधकाम
चीनने गलवान खोऱ्यातील संघर्ष झालेल्या ठिकाणी पुन्हा बांधकाम केले आहे. सॅटलाइट फोटोवरुन चीनने संघर्ष झालेल्या भागात पुन्हा बांधकाम केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मॅक्सार या स्पेस टेक्नोलॉजी कंपनीने २२ जून रोजी हे फोटो काढले आहेत. पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चीनने बांधकाम केल्याचे यातून स्पष्ट दिसते. १७ जून ते २२ जून या कालावधीत हे बांधकाम करण्यात आले आहे. कारण प्लॅनेट लॅबच्या १६ जूनच्या फोटोमध्ये संघर्ष झालेल्या ठिकाणी असे कुठलेही बांधकाम दिसले नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 7:58 am

Web Title: chinese building helipad in pangong tso massing troops on southern bank of lake dmp 82
Next Stories
1 वर्षाच्या अखेरिस भारताला मिळणार S-400 अ‍ॅडव्हांस्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम
2 चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी आणि बांधकामे थांबवावी!
3 देशात, राज्यात रुग्णवाढीचा उच्चांक
Just Now!
X