दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने १ लाख ४० हजार चिनी सीसीटीव्ही कॅमेर बसवले असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीनविरोधात देशभरात संताप असतानाच हा वाद निर्माण झाला आहे. भारतात सध्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जावा यासाठी मोहीम सुरु आहे. केंद्र सरकारने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी आणल्यानंतर हा विरोध अजून तीव्र झाला आहे. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

दिल्लीत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे चिनी कंपनी हिकव्हिजनने तयार केलेले आहेत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हजारो लोकांनी या कंपनीचं अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड केलेलं असून यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. भाजपाने या मुद्द्यावरुन आम आदमी पक्षाला टार्गेट केलं असून लवकरात लवकर ही चूक सुधारावी अशी मागणी केली आहे. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे सगळं राजकारण असल्याचं म्हटलं आहे.

“सीसीटीव्ही हा एकमेव धोका नाही. पण जेव्हा लोक सीसीटीव्ही पाहण्यासाठी चिनी कंपनीचं अ‍ॅपडाउनलोड करतील तेव्हा मोठा धोका आहे,” अशी माहिती सायबर सेक्युरिटी एक्स्पर्ट अनुज अग्रवाल यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिली आहे. “हे अ‍ॅप चीनमधील कोणतीही कंपनी, सरकार किंवा लष्कराकडून हाताळलं जाऊ शकतं. अशा स्थितीत दिल्लीच्या रस्त्यांवर काय सुरु आहे याची माहिती त्यांना मिळत राहील. अशी घुसखोरी रोखण्यासाठी कोणतीही सुरक्षा फिचर्स यामध्ये नाहीत,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

गतवर्षी जुलै महिन्यात दिल्ली सरकारने निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण कऱण्यासाठी राजधानीत सर्व रहिवाशी तसंच व्यवसायिक संकुलांमध्ये एकूण दीड लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा आदेश दिला होता. भाजपाने या मुद्द्यावरुन आम आदमी पक्षाला घेरलं असून लवकरात लवकर चिनी कंपनीसोबतचा करार मोडला जावा आणि अॅपदेखील हटवण्यात यावं अशी मागणी केली आहे.

“आश्चर्य म्हणजे सर्व्हरदेखील चीनचं आहे. याच्या आधारे दिल्लीतील प्रत्येक जागेवर ते नजर ठेऊ शकतात. दिल्ली सरकारने चिनी कंपनीचे कॅमेरे का बसवले याचं उत्तर दिलं पाहिजे,” अशी मागणी भाजपा नेते शाहनवाज हुसेन यांनी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी या वादावर उत्तर देताना हे सगळं राजकारण असून, आपल्याला यामध्ये पडायचं नसल्याचं म्हटलं आहे.