जगभरामध्ये करोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर चीनमधील एका शहरामध्ये रविवारी ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संक्षयित रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर शहरामधील आरोग्य यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी सध्या तरी या आजाराचे दोन रुग्ण आढळून आल्याचं म्हटलं आहे. मात्र प्राण्यांमधून मानवामध्ये या आजाराचा सहज संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच भविष्यात अशी आणखीन काही रुग्ण आढळण्याची शक्यता असल्यानेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार, मंगोलियाच्या स्वायत्त क्षेत्रातील बयन्नुरमध्ये ब्यूबॉनिक प्लेगवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिसऱ्या स्तरावरील इशारा दिला आहे. ब्यूबानिक प्लेगचे दोन रुग्ण बयन्नुरमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जारी केलेला सतर्कतेचा इशारा हा २०२० च्या शेवटपर्यंत लागू राहणार आहे.

नक्की वाचा >> Black Death नावाने ओळखला जाणारा ब्यूबॉनिक प्लेगची लक्षणं काय?, संसर्ग कसा होतो? जाणून घ्या

“सध्या शहरामध्ये प्लेगचा संसर्ग होण्याची भिती आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी जतनतेने जागृक राहणं गरजेचं आहे. नागरिकांनी स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. तसेच आरोग्यासंदर्भातील काही तक्रारी असल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राला भेट देणं गरजेचं आहे,” असं बयन्नुरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सरकारी वृत्तसंस्थेने १ जुलै रोजी दिलेल्या वृत्तामध्ये पश्चिम मंगोलियाच्या खोड प्रांतामध्ये ब्यूबानिक प्लेगचे दोन रुग्ण आढळून आल्याचे नमूद करण्यात आलं होतं. या रुग्णांना झालेला संसर्ग हा ब्यूबानिक प्लेगचाचा असल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यानंतर स्पष्ट झालं होतं.

पीग इन्फ्यूएन्जाचीही भिती

चीनमध्ये या ब्यूबोनिक प्लेगबरोबरच पीग इन्फ्लूएन्जाचीही भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. चीनमधील अँगीकल्चरल युनिव्हर्सिटी म्हणजेच शेतीसंदर्भातील संशोधन करणाऱ्या विद्यापिठातील शासस्त्रज्ञ तसेच चीनमधील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन या संस्थेप्रमाणेच इतर संस्थानी पीग इन्फ्यूएन्जा हा आजार डुक्करांच्या माध्यमातून पसरु शकतो असं म्हटलं आहे. हा विषाणू जेनोटाइप ४ प्रकाराचा आहे. म्हणजेच हा डुक्करांमध्ये अगदी विषाणू वेगाने पसतो. डुक्करांमधून त्याचा मानवालाही संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याचे ग्लोबल टाइम्समधील वृत्तामध्ये म्हटलं होतं.

भविष्यात या विषाणूचा संसर्गाचा वेग वाढण्याची भिती संसोधकांनी व्यक्त केली आहे. या विषाणूचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला सहज संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच करोनाप्रमाणे याचा जगभरात संसर्ग होण्याची शक्यता टाळता येत नाही असं बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

जी फोर प्रकारच्या या विषाणूचा संसर्ग कसा होत आहे यासंदर्भात अभ्यास करणे आणि डुक्करांसंदर्भातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चाचणी आणि वरचे वर तपासणी करण्याची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे.