जगभरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिका, भारत, ब्राझील या देशांना करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगभरातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येनं ३ कोटींचा टप्पा ओलांडला असून लाखो लोकांचा करोनामुळे मृत्यूही झाला आहे. यादरम्यान अनेक देशांमध्ये करोनावरील लस विकसित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. २०२१ या वर्षाच्या सुरूवातीलाच करोनावरील लस तयार करण्यात येणार असल्याचा दावा एका चिनी कंपनीनं केला आहे. २०२१ च्या सुरूवातीला अमेरिकेसह जगभरात करोनावरील लस वितरणासाठी तयार असेल अशी माहिती चिनी औषध उत्पादक कंपनी सिनोवॅकनं दिली.

सिनोवॅक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यीन वीडोंग यांनी याबाबत माहिती दिली. चीनमध्ये करोनावर विकसित होणारी लस तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मानवी चाचणीसाठी तयार आहे. जर ‘कोरोनावॅक’ लस तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मानवी चाचणीत यशस्वी झाली तर त्या लसीची अमेरिकेत विक्री करण्यासा अमेरिकेतील आरोग्य नियामक मंडळ ‘यूएस फूड अँड ड्रग अॅ़डमिनिस्ट्रेशन’कडे परवानगीसाठी अर्ज केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“अमेरिकेसह संपूर्ण जगभरात ही लस उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे,” असंही यीन म्हणाले. यापूर्वी गुरूवारी अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सननं करोनावरील लस विकसित करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा टप्पा पार केल्याचं म्हटलं होतं. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीची करोनावरील लस ही वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्याचंही सांगण्यात आलं होतं. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील नागरिकांना या लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून पुढे येण्याचं आवाहनही केलं होतं.