X

भारत-चीन दरम्यान बुलेट ट्रेनचा चीनच्या महावाणिज्य दूतांचा प्रस्ताव

अमेरिकेने व्यापारात बचावात्मक धोरण ठेवले असून ती नकारात्मक बाब आहे.

कोलकाता : कोलकाता ते कुनमिंग दरम्यान म्यानमार व बांगलादेशमार्गे बुलेट ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव चीनचे महावाणिज्यदूत मा झांवू यांनी मांडला आहे. भारत व चीन यांच्या दरम्यान उच्च वेगाची रेल्वे सुरू करता येईल, त्यासाठी कोलकाता व कुनमिंग यांची निवड करता येईल, कोलकात्याहून कुनमिंगला अवघ्या काही तासात पोहोचणे शक्य होणार आहे. म्यानमार व बांगलादेश या देशांनाही या बुलेट ट्रेनचा फायदा होईल, या मार्गावर काही उद्योग संकुलेही उभी करता येतील, त्यामुळे संबंधित देशांचा आर्थिक विकास होईल. २८०० कि.मी. लांबीचा हा प्रकल्प असेल. कुनमिंग येथे २०१५ मध्ये ग्रेटर मेकाँग सबरिजन परिषदेतही या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आला होता. बांगलादेश-चीन-भारत-म्यानमार या देशांच्या मार्गिकेत त्यामुळे व्यापार वाढेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की कुनमिंग ते कोलकाता या ठिकाणांना जोडणाऱ्या सिल्क मार्गाचे पुनरुज्जीवन करण्याचा आमचा इरादा आहे.

भारताने बेल्ट अँड रोड या चीनच्या प्रकल्पाला विरोध केला असला, तरी हा प्रकल्प चीनने जगजिंकण्यासाठी किंवा शेजारी देशांवर वर्चस्व गाजवण्यासाठी तयार केलेला नाही, असा खुलासा झांवू यांनी केला. ते म्हणाले, की भारत ही उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे. शेजारी देशांशी आम्हाला स्थिर संबंध हवे आहेत. भारत व रशिया हे दोन मोठे देश आहेत व ते चीनचे शेजारी आहेत. त्यांच्याशी आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत. भारतात रुपया घसरला असला, तरी भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती सुरू आहे, त्यात खंड पडणार नाही.

चीन व भारत या दोन्ही देशांचा उदय जग अनुभवत आहे. अमेरिकेने व्यापारात बचावात्मक धोरण ठेवले असून ती नकारात्मक बाब आहे. त्यामुळे सर्वंकष विकासासाठी आता भारत व चीन यांनी सहकार्य केले पाहिजे. भारतात सध्या रोजगार ही काळाची गरज आहे. भारतातील अनेक प्रकल्पांत गुंतवणूक करण्याची चीनच्या गुंतवणूकदारांची तयारी आहे. चीनकडून आयात केलेल्या वस्तू चांगल्या दर्जाच्या नसतात, अशी तक्रार या वेळी करण्यात आली त्यावर ते म्हणाले, की कुणीच फसवणूक करता कामा नये. व्यापार हा सचोटीनेच झाला पाहिजे. सिल्क रोड हे खुल्या व्यापाराचे उदाहरण असून त्यात विकासाचा जवळून संबंध आहे. बौद्ध धर्म सिल्क रोडमुळेच चीनमध्ये येऊ शकला.