या करोना महामारीच्या पूर्वीपासून चीन तिसऱ्या महायुद्धाची तयारी करत आहे आणि या महायुद्धासाठी चीनचा करोना विषाणूचा वापर करण्याचा कट होता असा आरोप अमेरिकेकडून केला जात होता. यासंदर्भात चीनच्या व्हायरोलॉजिस्ट डॉ. ली मेंग यान यांच्याशी इंडिया टुडेने बातचित केली आहे. या चर्चेतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

अमेरिकेच्या माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाबद्दल बोलताना डॉ. यान म्हणतात, जगावर राज्य कऱण्यासाठी चीन बायोवेपन वापरण्याच्या चीनच्या कटाविरुद्धचा पुरावा म्हणून हा अहवाल उपयोगी ठरु शकतो. जेव्हा हा विषाणू लॅबमधून आला आहे हे लोकांना कळेल तेव्हा जगाची दिशाभूल करण्यासाठी चुकीची माहिती नाकारणं आणि त्या बायोवेपनचा वापर करणं हा यामागचा उद्देश आहे.

त्या पुढे त्या म्हणतात, मी गेल्या जानेवारीपासून सांगत आहे की, हा विषाणू पीएलए या लॅबमधून आलेला आहे आणि या विषाणूच्या शोधासाठी चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांना मोठ्या संशोधनातून माणसांना हानी पोहोचवणारा हा विषाणू सापडला आणि तो त्यांनी हेतुपुरस्सर जगभरात पसरवला. चीनच्या सरकारला हे बरोबर माहित आहे आणि म्हणूनच त्यांना काही वेळातच अपेक्षित परिणाम दिसू लागला.

हा विषाणू चीनच्या शत्रू राष्ट्रांची वैद्यकीय व्यवस्था ढासळावी यासाठी पसरवण्यात आला असल्याचं अमेरिकेने सादर केलेल्या अहवालात नमूद केलं आहे. त्याविषयी बोलताना डॉ. यान म्हणतात, हा दावा नक्कीच खरा आहे. या अनियंत्रित अशा बायोवेपन्सचा वापर करुन वैद्यकीय व्यवस्थेवर हल्ला चढवला जातो. ह्या बायोवेपनने जास्त मृत्यू होणार नाहीत मात्र शत्रूराष्ट्रांची आरोग्य व्यवस्था ढासळेल आणि हाच उद्देश हा विषाणू पसरवण्यामागे होता. गेल्या वर्षी वुहानमध्ये या विषाणूची सामुदायिक चाचणी झाली आणि सगळाच गोंधळ उडाला.

चिनी माध्यमांनी ह्या अहवालाला कोणताही आधार नसल्याचा दावा केला आहे. त्याबद्दल त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, चिनी सरकारकडून याबद्दल देण्यात आलेला प्रतिसाद पाठ्यपुस्तकांमधूनही सांगण्यात आला आहे. मात्र, तो चुकीची माहिती देणारा आहे. आपल्या स्पष्टीकऱणात चीन म्हणतो की या विषाणूचं स्वरुप ओळखायचं असेल तर या विषाणूचा उत्क्रांतीच्या इतिहासाशी संबंध जोडून पाहायला हवा.