पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लडाखचा दौरा केल्यानंतर चीनने त्यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. मोदींच्या दौऱ्यासंदर्भात बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अगदी मवाळ भूमिका घेतल्याचे पहायला मिळालं आहे. भारत आणि चीन या भागामधील परिस्थिती मळाव होण्यासंदर्भात पावले उचलत असल्याचा दाखला देत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी कोणत्याही देशाने हा वाद अजून चिघळण्यासारखं पाऊल उचलू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

“भारत आणि चीन यांच्यामध्ये संवाद सुरु आहे. लष्करी तसेच राजकीय चर्चेच्या माध्यमातून या भागातील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. अशावेळी कोणत्याही पक्षाने या प्रदेशामधील तणाव वाढणारं पाऊल उचलू नये,” असं मत चीनच्या परदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलं आहे.

Photos : …अन् मोदी थेट जवानांची भेट घेण्यासाठी लडाखमध्ये पोहचले

पंतप्रधान मोदींच्या लडाख दौऱ्यानंतर चीनकडून आलेल्या या प्रतिक्रियेवरुन चीनने लडाख प्रश्नी आपली भूमिका मवाळ केल्याचे संकेत दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर भारताला मिळणारा वाढता पाठिंबा, भारताने लडाखमध्ये केलेली तयारी या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर चीनने भारताविरुद्ध मळाव धोरण राबवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याची चर्चा आहे.

पंतप्रधान मोदींनी निमू येथील फॉरवर्ड पोस्टवर तैनात असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची आणि सैनिकांची मोदींनी भेट घेतली आहे. येथील परिस्थितीचा मोदींनी आढावा घेतला असून नक्की या परिसामध्ये कशापद्धतीने सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मोदींना दिली. निमू येथे तैनात असणाऱ्या लष्कराच्या जवनांबरोबरच हवाई दलाचे अधिकारी आणि आयटीबीपी म्हणजेच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्सच्या जवानांशीही मोदींनी संवाद साधला. भारत चीन सीमेवर पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिसेंमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरामधून संताप व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या अचानक ठरलेल्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे.