करोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चहूबाजुंनी घेरल्या गेलेल्या चीनने सध्या आक्रमक भूमिका घेतली आहे. लडाख सीमेवर चीनचा भारताबरोबर वाद सुरु आहे तर दुसऱ्याबाजूला त्यांनी तैवानलाही धमकी दिली आहे. तैवानला एकीकरणाचा प्रस्ताव मान्य नसेल, तर हल्ला करु अशी धमकी चीनने दिली आहे. आज तकने हे वृत्त दिले आहे.

‘तैवानला स्वतंत्र होण्यापासून आम्हाला रोखता आले नाही, तर चीन थेट हल्ला करेल’ असा इशारा चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनचे सदस्य आणि जॉईंट स्टाफ विभागाचे प्रमुख ली झुओचेंग यांनी दिला आहे. ली झुओचेंग हे चिनी सैन्यात वरिष्ठ जनरल पदावर आहेत. चीनमध्ये इतक्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीने असे विधान करणे अत्यंत दुर्मिळ बाब आहे. बीजींगच्या ग्रेट हॉल ऑफ द पब्लिक येथे शुक्रवारी ली झुओचेंग यांनी हे आक्रमक विधान केले.

“शांततेने एकीकरणाचे मार्ग बंद झाले, तर चीनचे सैन्य संपूर्ण देशाला सोबत घेऊन बंडखोरांवर कारवाई करेल” असे ली झुओचेंग म्हणाले. “सैन्याचा वापर न करण्याचा आम्ही कुठलाही शब्द दिलेला नाही. तैवानमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही हा पर्याय राखून ठेवला आहे” असे ली झुओचेंग यांनी सांगितले.

तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनीही चीनला दिला होता इशारा
यापूर्वी जानेवारी महिन्यात त्साई ईंग वेन यांची दुसऱ्यांदा तैवानच्या राष्ट्राध्यपदी निवड झाली. त्यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट चीनला इशारा दिला होता. चीनने तैवानबद्दलच्या कठोर धोरणांचा फेरविचार करावा. तैवान एक स्वतंत्र देश आहे. चीनने तैवानवर हल्ला केला तर, त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्साई ईंग वेन यांनी दिला होता.

चीनने या निवडणुकीत त्साई ईंग वेन यांचा पराभव कसा होईल ते पाहिले, कारण त्साई आणि त्यांचा पक्ष तैवानला चीनचा भाग मानत नाही. त्यांच्या दृष्टीने तैवान एक स्वतंत्र ओळख असलेला देश आहे. तैवान आपलाच भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे.