संक्रांत जवळ आली असताना चिनी मांजा (दोरा) मागणी वाढत आहे, पण या मांजामुळे अनेकांचे जीव आतापर्यंत गेले आहेत. पक्षी व प्राण्यांनाही जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे या मांजावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी तेलंगण वन विभाग, तेलंगण जैवविविधता मंडळ व प्राणी संरक्षण संघटनांनी केली आहे.
हैदराबाद व इतरही शहरांमध्ये संक्रांतीला पतंग उडवले जातात. त्यात दरवर्षी चिनी मांजामुळे माणसे, प्राणी व पक्ष्यांना इजा झाल्याची उदाहरणे आहेत. यात पक्षीही बळी पडतात तसेच इतर पक्षीही या धाग्यांमध्ये अडकून मरतात. हैदराबाद येथे चिनी मांजावर बंदी घालण्याची मागणी करणारे पत्र तेलंगण वन विभाग, तेलंगण जैवविविधता मंडळ व प्राणी संरक्षण संघटनांनी सरकारला पाठवले आहे. प्राणिप्रेमींच्या मते गुजरात, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अनुसार आधीपासूनच चिनी मांजावर बंदी आहे. तेलंगण सरकारनेही अशी बंदी लागू करावी, कारण हा मांजा विषारी व विघटनशील नसतो, त्यामुळे पक्षी व पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. संक्रांतीला अनेक पक्षी तडफडत मरतात, त्यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी या मांजावर बंदीची गरज आहे, असे हैदराबाद येथील ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेच्या व्यवस्थापक सी संयुक्ता यांनी सांगितले. आपला नेहमीचा सुती धागा घातक नसतो. नायलॉनचा धागा मात्र घातक असतो. तो खूप धारदार असल्याने पक्ष्यांना व माणसांनाही जीवघेणा ठरु शकतो.