भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नुकत्याच आटोपलेल्या जपान दौऱ्याबाबत चीनच्या सरकारी वृत्तपत्रांनी आगपाखड केली असतानाच चीनने मात्र सावध पवित्रा घेतला आहे.
भारत आणि जपानमधील संबंध अधिक दृढ झाले तर विभागीय शांतता, स्थैर्य आणि विकासासाठी ते सहाय्यकच ठरतील, असे चीनचे परराष्ट्र प्रवक्ते हाँग लेइ यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. सागरी सुरक्षेबाबत भारताला सहकार्य करण्याचा निर्णय जपानने घेतला आहे. याद्वारे चीनच्या शेजारी देशांशी धोरणात्मक युती करून जपान चीनची कोंडी करू पाहात आहे, अशी टीका ‘ग्लोबल टाइम्स’ या चीनच्या सरकारी पक्षाच्या वृत्तपत्राने गुरुवारच्य संपादकीयात केली आहे. सिंग चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर होते मात्र उभय देशांतील सागरी सहकार्याचा निर्णय सिंग आणि जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांच्या म्यानमारमधील एका भेटीतच झाला होता, असे या अग्रलेखात म्हटले आहे.
चीन २१ व्या शतकात आपल्यावर प्रभाव पाडेल, अशी जपानची भीती आहे. प्रत्यक्षात आशिया खंडावर चीनचाच प्रभाव वाढणार असून तो रोखण्याची क्षमता जपानमध्ये नाही, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.