अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या भेटीमुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंधांना बळकटी मिळाली आहे. फक्त दोन्ही देशांनी समजूतदारपणे सीमाप्रश्नावर समाधानकारक तोडगा काढण्याची तयारी दाखविणे गरजेचे आहे, अशा शब्दांत चीनमधील प्रसारमाध्यमांनी मोदी-जिनपिंग भेटीबाबत समाधान व्यक्त केले आहे.
मतभेदाच्या प्रश्नांवर समाधानकारक आणि दोन्ही देशांना मान्य असलेला तोडगा काढावा अशी क्षी जिनपिंग यांची भूमिका आहे. मात्र या भेटीने भारत-चीन संबंधांना नवे आयाम प्राप्त करून दिले आहेत, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाँग ली यांनी दिली. सीमाप्रश्नावर अंतिम तोडगा काढण्यापूर्वी उभय देशांमधील सौहार्दता आणि शांततामय सहजीवन वाढीस लागावे असे प्रयत्न झाल्याची प्रशस्तीही परराष्ट्र मंत्रालयाने जोडली. व्यापार, रेल्वे खाते, तंत्रज्ञान, सांस्कृतिक सहकार्य, माहिती आणि प्रसारण, अवकाश संशोधन अशा अनेक क्षेत्रांत झालेल्या करारांबाबत चीनमधील प्रसारमाध्यमे आणि चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही समाधान व्यक्त केले.
टागोरांच्या कविता, गांधीजींचे उद्गार
भारत दौऱ्यात जिनपिंग यांनी आपल्या संवादादरम्यान गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि महात्मा गांधी यांच्या अनेक उद्गारांचा मुक्तपणे वापर केला. ‘ग्रीष्मात बहरणाऱ्या फुलांसारखे वाढावे, शिशिरातील पानगळीप्रमाणे शांत-मोहकपणे विलीन व्हावे’ ही गुरुदेव टागोरांची कविता त्यांनी वापरली. पं. नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या वक्तव्यांचे दाखलेही दिले.