लडाखमधील सीमावाद शमवण्यासाठी एकीकडे कमांडर स्तरावर चर्चा करणाऱ्या चीनने आता आपला रंग दाखवला आहे. एकीकडे शांततेच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे सैन्याची जमवाजमव आणि सराव सुरू असल्याचा व्हिडीओ चीननेच जारी केला आहे. विशेष म्हणजे चीनचे सरकारी प्रसारमाध्यम म्हणून ओळख असणाऱ्या ग्लोबल टाइम्सने हा धक्कादायक व्हिडीओ टि्वटरवर पोस्ट केला आहे.

काय आहे त्या व्हिडीओमध्ये?
ग्लोबल टाइम्सने टि्वट केलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की पिपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) हजारो जवान आणि पीएलएची हवाई ब्रिगेड लष्करी सराव करत आहे. “चीन-भारत यांच्यात ज्या सीमेवरून तणाव आहे तिथे पोहोचण्यास या सैनिकांना हुबेई प्रांतातून केवळ काही तास लागतील,” असा इशाराही त्या टि्वटमध्ये देण्यात आला आहे.

शनिवारी भारत आणि चीनदरम्यान कमांडर स्तरावर चर्चा करण्यात आली होती. एप्रिलमध्ये या सीमाभागात जी स्थिती होती, तीच कायम ठेवावी, अशी भारताने या चर्चेदरम्यान मागणी केली होती. चीनने मात्र, भारताकडे कोणत्याही रस्त्यांची निर्मिती न करण्याची मागणी कायम ठेवली होती.

त्यानंतर द्विपक्षीय संबंधांना अधिक दृढ करण्यासाठी भारत चीन सीमा क्षेत्रात शांततापूर्ण वातावरण आवश्यक आहे. दोन्ही पक्षांतर्फे डिप्लोमॅटिक संबंधांच्या ७० व्या वर्षाचीदेखील आठवण काढण्यात आली. लवकरच या प्रश्नाचा तोडगा काढून चांगलं संबंध वाढवण्यावर भर देण्यात यावा यावर दोन्ही देशांचं एकमत झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली होती. मात्र आता चीनने पुन्हा आपला रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे चर्चा करायची आणि दुसरीकडे आपली युद्धाची तयारी सुरू असल्याचे दाखवायचे, असा खेळ चीनने सुरू केला आहे.