भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशला भेट देऊ नये, असा ‘सल्ला’ चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने मंगळवारी एका लेखान्वये दिला आहे. मोदी यांच्या चीन दौऱ्यास दोन दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच त्यांना हा सल्ला देण्यात आला आहे. भारताच्याच चुकीच्या धोरणांमुळे चीन आणि भारत यांच्यातील व्यापारी पातळीवर मोठी दरी पडली आहे आणि तरीही ही बाब भारत मान्य करणार नाही, असाही टोमणा या लेखामध्ये मारण्यात आला आहे.
‘ग्लोबल टाइम्स’ च्या लेखात ह्य़ू झीयाँग यांनी भारतावर मोठय़ा प्रमाणावर टीकास्त्र सोडले आहे. दक्षिण आशियात चीनने आर्थिक विकासाद्वारे उत्पन्न केलेल्या विविध संधींचा फायदा घेण्याचा प्रयत्न भारत करीत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
 बीजिंगच्या सत्ताकेंद्रात यासंबंधी काय प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत, हे स्पष्ट झालेले नसले तरी भारत आणि मोदी यांच्याकडे बघण्याचा चीनच्या सत्ताकेंद्राचा दृष्टिकोन काय आहे, याचे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत.
चीनसमवेत भारताचे राजनैतिक संबंध सुधारायचे असतील तर भारताने ‘काय करावे’ यापेक्षा ‘काय करू नये’ यासंबंधीच झीयॉँग यांनी जास्त ‘सल्ले’ दिले आहेत. आपले राजकीय हित साधण्यासाठी मोदी यांनी अरुणाचल प्रदेशचा दौरा करू नये किंवा द्विपक्षीय संबंधांना बाधा येईल, असे कोणतेही वक्तव्य करू नये. दलाई लामा यांना भारताने कदापिही पाठिंबा देऊ नये तसेच भारत आणि चीन यांच्यात मोठय़ा प्रमाणावर अडथळा आणणाऱ्या तिबेट मुद्दय़ाचाही त्यांनी उच्चार करू नये, आदी उपदेशाचे डोस झीयाँग यांनी मोदी यांना व पर्यायाने भारतालाही दिले आहेत.
चीनसमवेत वाटाघाटी करताना देशातील आपली पत वाढावी म्हणून नरेंद्र मोदी हे सीमातंटा तसेच सुरक्षा मुद्दय़ावरून चलाखीचे राजकारण करीत असतात, अशीही टिप्पणी झीयाँग यांनी केली आहे.