चीनमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याने आता तेथे मुलांना विवाहासाठी मुली मिळणे दुरापास्त झाले असून त्यांच्यावर आता बाहेरच्या देशातील मुलींशी विवाह करण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस तिथे मुलींच्या तुलनेत मुलग्यांचे प्रमाण वाढत आहे. चीन हा सध्यातरी जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे.
चीनमध्ये पुरुषांची संख्या ६९.७२ कोटी असून स्त्रियांची संख्या ६६.३४ कोटी आहे, याचा अर्थ स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची संख्या ३.३८ कोटींनी जास्त आहे, असे चीनच्या ‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक’चे मा जियानतांग यांनी सांगितले.
हाँगकाँगव मकाव वगळता चीनची लोकसंख्या २०१३ मध्ये १.३६ अब्ज होती. त्यात स्त्री-पुरुष प्रमाण व्यस्त होत आहे कारण अनेकदा लिंगनिदान करून गर्भपात केले जातात व आशियातील इतर देशांप्रमाणे चीनमध्येही कुटुंबाला वारसदार म्हणून मुलगे होण्यास पसंती दिली जाते.
मुलगा हा वंशाचा दिवा असतो व तो कुटुंबाचा वृक्ष पुढे चालू ठेवतो, असा समज येथेही आहे. चीनच्या सरकारने लिंगनिदान चाचण्याविरोधात जोरदार मोहीम उघडली असून लैंगिक समानता आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.
लिंगनिदानानंतरच्या गर्भपातांची संख्या गेल्या तीन दशकांत चीनमध्ये सध्या सर्वाधिक असून एक मूल धोरण हे त्याला कारण होते. काही चिनी पुरुषांनी तर व्हिएतनामी मुलींशी विवाह केले असून दिवसेंदिवस पुरुष-स्त्रिया यांच्या संख्येतील फरक वाढत चालल्याने हे प्रकार आणखी वाढणार आहेत.