चिनी लष्कराचा मणिपूरमधील चंडेल जिल्ह्य़ात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याशी संबंध होता, हा आरोप फेटाळण्यात आला आहे. चीनचे प्रवक्ते होंग लेइ यांनी सांगितले, की याबाबतच्या बातम्या निराधार आहेत. भारतातील हल्ल्याशी चीनचा संबंध नाही. त्याबाबतच्या बातम्या निराधार आहेत. चीन सरकारचे धोरण शेजारी देशांमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आहे. कुठल्याही देशातील सरकारविरोधी गटांना आम्ही मदत केलेली नाही व ती करण्याचा प्रश्नच येत नाही.
मणिपूरमध्ये चंडेल जिल्ह्य़ात लष्करावर केलेल्या हल्ल्यात बंडखोरांनी लष्कराचे १८ जवानांना ठार केले होते तर ११ जण त्यात जखमी झाले होते.
बंडखोरांवर प्रतिहल्ला करताना भारतीय लष्कराने काल म्यानमारमध्ये घुसून १०० अतिरेक्यांना ठार केले होते. एलिच कमांडोजनी ही कारवाई केली. ते म्यानमारमध्ये काही किलोमीटर आत घुसले होते. मणिपूर व अरुणाचल प्रदेशातील एनएससीएन व केवायकेएल या संघटनांचे अतिरेकी लपून बसलेल्या ठिकाणी लष्कराने हा हल्ला केला.
एनएससीएनच्या-के नेत्यांशी पीपल्स लिबरेशन आर्मीचा संपर्क असल्याच्या बातम्या खोटय़ा असल्याचे चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते पीपल्स लिबरेशन आर्मी व भारतीय अतिरेकी यांच्यात संपर्क शक्य आहे. एनएससीएन-के या संघटनेने चिनी लष्कराच्या सांगण्यावरून भारतीय लष्कराशी शस्त्रसंधी तोडली, असे एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने म्हटले आहे. ‘सेंटर फॉर आशियन पॅसिफिक स्टडीज’ या संस्थेचे झाओ गानचेंग यांनी सांगितले, की चीनचा पूर्व भारतातील अतिरेक्यांना पाठिंबा असल्याचा भारताचा आरोप जुनाच आहे पण चीन व या अतिरेक्यांचा संबंध शक्य नाही कारण भारत व चीन यांच्यात १९८८ पासून द्विपक्षीय संबंध आहेत. ‘साऊथ अँड साऊथइस्ट आशियन अँड ओशनिया स्टडीज’चे उपसंचालक ली ली यांनी सांगितले, की हा आरोप खोडसाळपणाचा आहे. चीनने भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणे शक्य नाही कारण दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये नुकतीच भेट झालेली आहे.