चीनचे नवनिर्वाचित पंतप्रधान लि केकियांग हे पुढील आठवडय़ात भारत आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहेत. लडाखमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीनंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेलेले असताना तसेच पाकिस्तानात लोकशाही मार्गाने नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानपदी नियुक्त झाल्यानंतर प्रथमच केकियांग दोन्ही देशांच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान केकियांग हे १९ ते २१ या काळात भारतात तर २२ व २३ मे रोजी पाकिस्तानात येणार आहेत. भारताचे चीन आणि पाकिस्तानशी असलेला सीमावाद  आणि तिन्ही देशांचे एकमेकांसोबतचे भविष्यातील संबंध यादृष्टीने चीनच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
लडाखमध्ये भारतीय हद्दीत चिनी सैन्याने केलेल्या घुसखोरीनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आलेली कटूता सैन्य माघारीनंतर काहीशी कमी झाली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद नुकतेच चीन दौऱ्यावर गेल्यामुळे परिस्थिती आणखी निवळली असून आता चीनचे पंतप्रधान लि केकियांग पुढील आठवडय़ात भारत भेटीवर येणार आहेत.
१९ मेपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणारे केकियांग पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर भारतीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते होंग लेई यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
५७ वर्षीय लि भारत भेटीदरम्यान देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलाही भेट देणार आहेत. त्यानंतर तेथून ते पाकिस्तानला रवाना होणार आहेत.
मार्चमध्ये चीनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथम परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या केकियांग यांनी भारतापासून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. भारत, पाकिस्ताननंतर केकियांग जर्मनी तसेच स्वित्र्झलडच्या दौऱ्यावरही जाणार आहेत.
भारतीय दौऱ्यात केकियांग दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याबरोबरच विविध क्षेत्रांतील विकासकामांमध्येही महत्त्वपूर्ण सहकार्य करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे होंग यांनी सांगितले.
चीनच्या नेतृत्वाने आपल्या पहिल्यावहिल्या दौऱ्यांसाठी रशिया आणि भारताला पसंती दिली आहे. म्हणूनच चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी मार्चमध्ये रशियाचा दौरा केला होता. तर पंतप्रधान केकियांग यांनी भारतापासून आपल्या परदेश दौऱ्यांना सुरुवात केली आहे.  
दरम्यान, राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांच्या आमंत्रणावरून लि २२ व २३ मे या दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहेत. पाकिस्तान दौऱ्यावर येणाऱ्या ली केकियांग यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अझिज अहमद चौधरी यांनी स्पष्ट केले. चीनच्या पंतप्रधानांना  पाकिस्तानात नव्याने सत्तेवर येणाऱ्या नेतृत्वाला भेटण्याची संधी मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन या पक्षाला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे पाकिस्तानात त्यांचे सरकार स्थापन होईल, यात शंका नाही. पाकिस्तानात नव्याने झालेल्या या घडामोडी तसेच बदलांचा इस्लामाबाद आणि बीजिंगच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केला.