बीजिंग : कोविड-१९ विरुद्ध चीनची लढाई ही ‘मोक्याची कामगिरी’ असल्याचे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी म्हटले आहे. करोनाबाधितांच्या प्रमाणात नियमित घट होत असल्याने पार्लमेंटचे लांबणीवर टाकलेले अधिवेशन २२ मे रोजी घेण्याची सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने तयारी केली आहे.

देशात बुधवारी कोविड-१९ची नवी केवळ ४ प्रकरणे नोंदवण्यात आल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या ८२,८६२ वर पोहचली. या रोगामुळे गेल्या दोन दिवसांत नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात करण्यात आलेली नाही.

चीनमध्ये करोनाने ४ हजार ६३३ बळी घेतले आहेत. करोनाला आळा घालण्याच्या चीनच्या जिकिरीच्या प्रयत्नांमुळे हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी असलेल्या वुहान शहराचे संरक्षण करण्याच्या लढाईचा निर्णायक परिणाम दिसून आला आहे, असे जिनपिंग यांनी बुधवारी सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या (सीपीसी) एका उच्चस्तरीय केंद्रीय समितीच्या बैठकीत सांगितले.

या महासाथीविरुद्धच्या देशव्यापी लढय़ात आम्ही मोठी मोक्याची कामगिरी केली असल्याचे जिनपिंग यांनी म्हटल्याचे वृत्त ‘झिन्हुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिले. वुहानसह हुबेईने सामुदायिक स्तरावर महासाथीचा प्रतिबंध व नियंत्रण यांचे प्रयत्न बळकट करणे सुरूच ठेवो, असे ते म्हणाले.

रशियाच्या सीमेलगतच्या हेलाँगजियांग प्रांतात रशियातील शहरांमधून परतलेले चिनी नागरिक मोठय़ा प्रमाणावर करोनाबाधित झाले असल्याने, तेथील संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

कामे सुरू करणे आणि उद्योगांना चालना देणे, प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व  मध्यम उद्योगांच्या अडचणी दूर करणे, तसेच वाहने, इलेक्ट्रॉनिक माहिती व जैव-औषधे यांसारख्या महत्त्वाच्या उद्योगांचे गाडे रुळावर आणणे यांच्या आवश्यकतेवर या बैठकीत भर देण्यात आला.