अनौपचारिक शिखर परिषदेसाठी चीन सकारात्मक

शुभजित रॉय, एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यातील पुढील अनौपचारिक शिखर परिषद ११ ऑक्टोबर रोजी वाराणसीमध्ये घेण्याचे भारताने प्रस्तावित केले आहे, अशी माहिती ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे. या प्रस्तावाचा आम्ही सकारात्मक विचार करीत असल्याचे चीनने कळविले आहे.

चीनच्या हुबेई प्रांतातील वुहानमध्ये गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दोन नेत्यांमध्ये पहिली अनौपचारिक शिखर परिषद झाली होती. वुहानमध्ये मोदी यांचे जसे आदरातिथ्य करण्यात आले त्याच प्रकारे मोदी यांची जिनपिंग यांचे आदरातिथ्य करण्याची इच्छा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोदी यांना आपल्या लोकसभा मतदारसंघात क्षी जिनिपग यांना निमंत्रित करण्याची इच्छा असल्याने वाराणसी हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जिनपिंग यांनी मोदी यांना झियामेन प्रांतात निमंत्रण दिले होते त्याप्रमाणे वाराणसीत जिनपिंग यांना निमंत्रित केले जाणार आहे. जवळपास ३० वर्षांपूर्वी जिनपिंग हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे पदाधिकारी झाले होते.

सप्टेंबर २०१४ मध्ये मोदी यांनी त्यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे जिनपिंग यांचे आदरातिथ्य केले होते आणि जिनपिंग यांनी झियान येथे मे २०१५ मध्ये मोदी यांचे आदरातिथ्य केले होते. नियोजित कालावधीत क्षी जिनपिंग हे उपलब्ध आहेत का, अशी विनंतीवजा प्राथमिक विचारणा राजनैतिक मार्गाने चीनकडे करण्यात आली आहे.

किरगीझची राजधानी बिश्केकमध्ये १३-१४ जून रोजी शांघाय सहकार्य परिषद (एससीओ) आयोजित करण्यात आली असून दोन्ही नेते त्यामध्ये सहभागी होणार आहेत. दोन्ही नेत्यांची बिश्केकमध्ये पहिली बैठक होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

डोकलामच्या प्रश्नावरून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता, त्यापूर्वी दोन्ही नेत्यांची एससीओ परिषदेत कझाकस्तानच्या अस्ताना येथे भेट झाली होती.